Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादरविवारी  शहरातील काही भागात ‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रविवारी  शहरातील काही भागात ‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रविवारी  शहरातील काही भागात

‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर –सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात रविवार दि.११ रोजी  तीन निवडक भागात ब्लॅक आऊट चा सराव अर्थात मॉक ड्रील करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे शहर मंडळचे अधीक्षक अभियंता  यांनी कळविले आहे. महावितरण मार्फत सादर करण्यात आलेल्या नियोजनानुसार तीन वेगवेगळे झोन करुन त्यात तीन वेगळ्या वेळी  हा सराव करण्यात येणार आहे.

सतर्क राहण्याचे आवाहन

दरम्यान हा केवळ सरावाचा भाग असून घाबरण्याचे कारण नाही. आपली सज्जता तपासण्यासाठी केला जाणारा हा उपक्रम आहे. त्यात प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे व सतर्क रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

क्षेत्रनिहाय वेळापत्रक याप्रमाणे-

१.      ३३ केव्ही , एन-४, ११ के.व्ही. जालना रोड, ११ केव्ही गारखेडा या उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या विद्यानगर, विशाल नगर, न्यू हनुमान नगर, न्यू गणेश नगर, राममंदिर परिसर, मातोश्री नगर, तिरुमला सोसायटी, हुसेन कॉलनी, पुंडलिक नगर, हनुमान नगर, गणेश नगर या भागात सायं. साडेसात ते ७ वा. ५० मि. या कालावधीत ब्लॅक आऊट सराव केला जाईल. या भागात २२ मेगा वॅट इतका विद्युत भार असून १६ हजार ९५३ ग्राहक आहेत.

२.      १३२ केव्ही हर्सूल, ११ केवही भीमटेकडी, ११ केव्ही वॉटर वर्क्स, ११ केव्ही भगतसिंग नगर या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या हर्सूल, जटवाडा रोड, भगतसिंग नगर, चेतना नगर, जहांगिर कॉलनी, अंबर हिल, हरी ओम नगर, एकता नगर या भागात रात्री ८ ते ८ वा. २० मि.  या कालावधीत ब्लॅक आऊट सराव केला जाईल.  या भागात १० मे वॅट इतका विद्युत भार असून १८ हजार ग्राहक आहेत.

३.      ३३ केव्ही सातारा उपकेंद्र, ३३ केव्ही गोलवाडी  उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सातारा, नक्षत्रवाडी, गोलवाडी, कंचनवाडी, बीड बायपास रोड, देवळाई गाव परिसर, एमआयटी कॉलेज या भागात रात्री ९ ते ९ वा. २० मि. नी  ब्लॅक आऊट सराव केला जाईल. या भागात २५ मे. वॅट  विद्युत भार असून २५ हजार ग्राहक आहेत.

नागरिकांसाठी सुचनाःहा सराव असून कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. सायरन वाजल्यानंतर  ब्लॅक आऊट कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर आपल्या घरातील इनव्हर्टर्स, जनरेट वरुन देखील वीज पुरवठा बंद करुन अंधार करावयाचा आहे. घराच्या खिडक्यांचे पडदे बंद ठेवावयाचे आहेत. घरातून बाहेर उजेड पडणार नाही याची खबरदारी घ्यावयाची आहे.  जर आपण रस्त्यावर वाहन चालवित असाल तर तात्काळ वाहनाचे दिवे बंद करुन वाहनही बंद करावे व रस्त्याच्या कडेला काही काळ थांबावे.  याकालावधीत नागरिकांनी आपापल्या घरात वा जेथे असाल तेथे आडोशाला शांतपणे थांबावयाचे आहे. उगाच इकडे तिकडे फिरणे, चौकशा करणे, मोबाईलवरुन बोलणे, एकमेकांना आवाज देणे या सारख्या कृती करु नये. घरात आजारी, वयोवृद्ध, लहान बालके यांची काळजी घ्यावी. त्यांच्या जवळ थांबून त्यांना धीर द्यावा. आपल्या जवळपास कुणी आजारी असल्यास त्यांना या सरावाची कल्पना देऊन अवगत करावे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments