शेतकऱ्यांना सन २०२४ चे अतिवृष्टी अनुदान मिळावे- वाडेकर
कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल  यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी 
घनसावंगी/प्रतिनिधी/ घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून, शासनाने जाहीर केलेले अतिवृष्टी अनुदान अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. या पार्श्वभूमीवर शिव उद्योग सहकार सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने थकबाकी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये २०२४ च्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मका, भाजीपाला यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात हजारो शेतकरी अजूनही या मदतीपासून वंचित आहेत. काही भागांतील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असले, तरी बहुतांश गावांतील शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
 “शेतकऱ्यांनी तहसिलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा निवेदने सादर केली, परंतु ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. प्रशासनाचे म्हणणे आहे की, अतिवृष्टी अनुदानातील ८० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात येतील. मात्र या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे स्पष्ट नाही. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना थकबाकी अनुदान वितरित करावे,” अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेनेतर्फे सादर करण्यात आलेल्या या निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या मागणीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये थोडी आशा निर्माण झाली असून, शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.