लखमापुरी येथे शॉर्ट सर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक
सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान; पंचनाम्याची मागणी
जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे मंगळवार,दि.23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे दहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली.या आगीत ऊसासह ठिबक सिंचन व्यवस्था व पीव्हीसी पाईप्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गट क्रमांक 43 मधील नंदराम आसाराम चित्राल,शंकर आसाराम चित्राल,संजय आसाराम चित्राल व गोपाल चंद्रकांत चित्राल यांच्या शेतात ऊस उभा होता.संबंधित शेतातून एल.टी.वीज वाहिनीचे खांब गेले असून,अलीकडील अतिवृष्टीमुळे उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आलेला होता.हा तुरा वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने ठिणगी पडून उसाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला,मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर ऊस जळून खाक झाला होता.या आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बटाईदार कुलदीप कवडे व कैलास भापकर यांनी ही माहिती दिली असून,संबंधित महसूल व वीज वितरण विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.दरम्यान,महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जळीत ऊसाची पाहणी केली असून फोटो व माहिती संकलित केली आहे.