Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसुखापूरी परिसरातील शेतकऱ्यांवर संकटांचा भिडीमार

सुखापूरी परिसरातील शेतकऱ्यांवर संकटांचा भिडीमार

सुखापूरी परिसरातील शेतकऱ्यांवर संकटांचा भिडीमार

बिबट्याची दहशत आणि एमएसईबीच्या रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेती अडचणीत

जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील सुखापूरी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी प्रचंड भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. परिसरातील अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले असून, शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ले करून शिकार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण सुखापूरी मंडळातील कुक्कडगांव,रेवलगांव,लखमापूरी,वडीकाळ्या,बेलगांव,रुई,भारडी,दहेगाव खुर्द व करंजळासह इतर गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भीतीच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी शेतीच्या कामासाठी बाहेर पडण्यास धजावत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ऊस तोडणी, ऊस लागवड, गहू व हरभरा पेरणी गहु ऊस टरबुज सारख्या पिकांना सारखं पाणी देणे व इतर कामे जसं की कापूस वेचणी तूर काढणी ऊस गहू खुरपणी सारखी महत्त्वाची शेतीची कामे सध्या सुरू असतानाही बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, सुखापूरी मंडळ हे गहु हरभरा टरबुजसारख्या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारे मंडळ म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. मात्र, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे आणि संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकरी मानसिक तणावाखाली सापडले आहेत.या संकटात भर टाकणारी आणखी एक गंभीर बाब म्हणजे एमएसईबी (महावितरण) कडून दिला जाणारा रात्रीचा वीजपुरवठा. सुखापूरी येथील एमएसईबी उपकेंद्रामार्फत दिवसा वीज बंद ठेवून रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे रात्री करावी लागत आहेत. आधीच बिबट्याची दहशत असताना, रात्री अंधारात शेतात काम करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याआधी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना आता बिबट्याची दहशत आणि एमएसईबीच्या रात्रीच्या लाईटमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. एकामागून एक येणाऱ्या या संकटांमुळे शेतकरी अक्षरशः होरपळून निघत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या सर्व गंभीर बाबी असूनही वनविभाग, वीज वितरण कंपनी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करणे, पिंजरे लावणे, तसेच दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याबाबत शेतकरी सातत्याने मागणी करत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या सुखापूरी परिसरातील शेतकऱ्यांवर संकटांचा भिडीमार सुरू असून, “शेतकऱ्यांना पिळून पिळून मारले जात असल्याचे” चित्र निर्माण झाले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने विशेष करून जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या कडे तातडीने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, रात्री ची लाईट ची व्यवस्था बंद करून दिवसाची शेतकऱ्यांना लाईट व्यवस्था करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments