सुखापुरी येथील समर्थ इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनातील भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
अंबड/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील समर्थ शैक्षणिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित समर्थ इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम शुक्रवार,दि. २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रंभादेवी मंदिर परिसर,सुखापुरी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अंबड पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.रईसभाई बागवान यांनी भूषविले.यावेळी सुखापुरी व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण शाळेतील बालगोपाळ विद्यार्थ्यांनी सादर केलेले बहारदार नृत्याविष्कार होते. लहानग्यांच्या निरागस सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमास भगवानराव राखुंडे (सरपंच, सुखापुरी),नसीर बागवान (उपसरपंच,सुखापुरी) यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. सचिन राठोड सर आणि शिवव्याख्याते श्री.लक्ष्मण शिंदे यांनी केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.रेखाताई दत्तात्रय राखुंडे,उपाध्यक्षा सौ. गंगा सुरेश पाटील,सचिव डॉ. सुरेश पाटील,सहसचिव श्री. रामेश्वर राखुंडे तसेच शाळेच्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.