अग्रवाल समाजाचा राष्ट्रीय ओबीसी
सुचीत समावेश करावा-ॲड.धन्नावत
राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे सदस्य हंसराज अहिर यांना अग्रवाल समाजाच्यावतीने निवेदन
जालना/प्रतिनिधी/ अग्रवाल समाजाचा राष्ट्रीय ओबीसी सुचित समावेश करण्यात यावा, अशी मागणी अग्रवाल समाजाच्यावतीने ॲड. महेश धन्नावत यांनी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे सदस्य हंसराज अहिर यांच्याकडे केली आहे.
हंसराज अहिर जालना दौऱ्यावर आले असता, ॲड. धन्नावत यांनी त्यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिहारमध्ये अग्रवाल समाज ओबीसीत मोडतो. तरी देखील इतर राज्यात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या या समाजाला जनरल कॅटेगरीमध्ये स्थान आहे. ही बाब विचारात घेता सर्व राज्यात हा समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला असल्याने समाजाचा राष्ट्रीय ओबीसी सूचित समावेश करावा, अशी विनंती ॲड. धन्नावत यांनी केली. यावेळी हंसराज अहिर म्हणाले की, स्वतःला सक्षम करण्यासाठी समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्य शासनाकडून जर अग्रवाल समाजाच्या ओबीसी समावेशाबाबत निवेदन प्राप्त झाले, तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल. अशा मागण्या योग्य पद्धतीने नोंदविल्या गेल्यास, त्या पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शक ठरतात. कोणताही निर्णय सर्वेक्षणाच्या आणि वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारेच घेतला जातो, असा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला. दरम्यान, ही मागणी सध्या चर्चेत असून समाजाकडून केंद्र व राज्य शासनाकडे पुढील हालचालीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती ॲड. महेश धन्नावत यांनी दिली, यावेळी उद्योजक अर्जुन पित्ती, डॉ. शिवदत्त विजयसेनानी, सुनील खरे, श्याम सारस्वत, डॉ. सचदेव उपस्थित होते