स्थास्वसं’ निवडणुकीत ओबीसीला योग्य प्रतिनिधित्व द्या-हेमंत पाटीललोकसंख्येनुसार उमेदवारी मिळावी; राजकीय पक्षांना आवाहन
पुणे /देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी सह सर्वच समाजात उत्साहाचे वातावरण आहे.अशात येत्या चार महिन्यात राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांना योग्य प्रतिनिधित्व द्या,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१४) राज्यातील राजकीय पक्षांना केले.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांनी महानगर पालिका,जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणुकीत उमेदवार निश्चित करतांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच ओबीसी समाजाला प्राधान्य देत त्यांच्या नेतृत्वाला योग्य प्रतिनिधित्व देण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २७% उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस त्यात आघाडीवर होते.आता देखील या पक्षांसह इतर पक्षांनी राजकीय नेतृत्वापासून वंचित राहिलेल्या ओबीसी समाजाला उमेदवारी निश्चितीत योग्य वाटा द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना यासंदर्भात पत्रव्यवहार करून त्यांची भेट घेणार असल्याचे, पाटील यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.या आदेशानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढणे राज्य सरकार ला बंधनकारक राहील.विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. आरक्षणासंदर्भात तिढा त्यामुळे सध्यापुरता सुटला आहे,असे पाटील म्हणाले.
