सोयगाव तालुक्यात खरीप संकटात; उत्पन्नात घट येण्याची भीती
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात ४२, ६४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी यांसारख्या पिकांवर पावसाचा विपरित परिणाम जाणवत आहे. सर्वाधिक २५,९४३ हेक्टरवर पेरलेल्या कपाशी पिकाची अवस्था चिंताजनक आहे. कैऱ्या तयार झाल्या असल्या, तरी अपरिपक्व राहील्याने उत्पादन अर्ध्याहून अधिक घटण्याची भीती आहे.पावसामुळे कपाशीच्या झाडांवरील बोंडे ओलाव्यामुळे गळून पडत आहे, तूर पिकाबाबतही अनिश्चितता आहे. मूग (९२.९ हेक्टर), उडीद (९४ हेक्टर), ज्वारी (३९ हेक्टर), मका (९ हजार हेक्टर) आणि इतर पिके (२८२ हेक्टर) या पिकांनाही तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत असून, शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक असून, त्याचे उत्पन्न न मिळाल्यास उपासमारीची वेळ येईल, अशी शेतकऱ्यांत भीती आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला कपाशी वेचनी वर येत असते, पण यंदा कपाशी चा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे कापूस आणि सोयाबीन पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचेआर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. त्यामुळे वेळेत आणि योग्य पंचनामे न झाल्यास नुकसान भरपाई मिळणे कठीण आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.