स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी;
जालन्यात 16 जणांवर गुन्हा दाखल
जालना : महावितरणतर्फे बसवण्यात आलेल्या स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी झाल्याचे आणखी काही प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी जालन्यातील 16 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यापूर्वी स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या 24 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांत एकच खळबळ उडाली आहे.
स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने फेरफार केल्यास त्याची माहिती थेट महावितरणला ऑनलाइन कळत आहे. अशा ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर वीजचोरी पकडली जात आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणने गेल्या काही दिवसांत केलेल्या तपासणीत स्मार्ट टीओडी मीटरमध्ये वीजचोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या ग्राहकांना काही महिन्यांपूर्वी टीओडी मीटर बसवण्यात आले होते. पण त्यांनी मीटरमध्ये फेरफार केल्याची माहिती महावितरणला लगेच ऑनलाइन उपलब्ध झाली. या ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे प्रत्यक्ष तपासणीत आढळून आले.
महावितरणच्या जालना शहर शाखेत कार्यरत सहायक अभियंता संजय गहाणे, सचिन उकंडे, सचिन गुल्हाने व सचिन बनकर यांनी सहकाऱ्यांसह जुना जालना येथील नीळकंठनगरमध्ये नुकतीच तपासणी मोहीम राबवली. काही ग्राहक वीजचोरी करत असल्याच्या संशयावरून त्यांचे मीटर जप्त करण्यात आले. सर्व मीटरची महावितरणच्या प्रयोगशाळेत वीजग्राहक/वापरकर्त्यांसमक्ष तपासणी केली असता मीटरला फोडफाड, छेडछाड व मीटरच्या सर्किटमध्ये फेरफार करून विजेची चोरी होत असल्याचे आढळले.
नीळकंठनगरमधील रमेश मच्छिंद्रनाथ गायकवाड, संजीव खांडेभराड, शेख फेरदोस बेगम अब्दुल रहेमान, समीर मेहबुब हुसेन, कैसर खान अजीज खान, शेख चाँद लाल शेख, मीर सरवली सय्यद, शेख आरीफ जरीफ, जफरखान चाँदखान पठाण, शेख हैदर शेख करीम, मस्तान पी. शेख उमर, इम्रान अहेमद सेफी अहेमद, शेख इम्रान शेख उस्मान, शेख इस्माईल शेख हमीद, सलीम शहिदखाँ व शेख युसूफ शेख यांनी वीजचोरी तसेच त्यांच्या माहितीतील इसमासोबत संगनमत करून मीटर फोडफाड करून छेडछाड व सर्किटमध्ये फेरफार केला.
सहायक अभियंता संजय गहाणे यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व वीजग्राहक/वापरकर्ते व त्यांच्या ओळखीच्या इसमांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 व 138 अन्वये सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्याधुनिक प्रणालीमुळे मीटरमधील फेरफार महावितरणला तत्काळ माहीत होत आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. त्यामुळे कुणीही मीटरमध्ये फेरफार करून वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी न पडता वीजग्राहकांनी त्याची तातडीने महावितरणला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
