जालना येथे प्रथमच संत श्री गुलाबराव
महाराज चरित्र कथा व सामूहिक पारायण
भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी/ तीर्थक्षेत्र चांदुरबाजार येथील संत श्री गुलाबराव महाराज यांच्या पालखीचे मंगळवार दि. 11 नोव्हेंबर रोजी जालना शहरात आगमन होत असून, यानिमित्त प्रथमच दोन दिवस भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत गुलाबराव महाराज पारायण ग्रुप आणि माहेश्वरी महिला मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
पालखी आगमनानिमित्त सोमवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत प्रसीद्ध कथाकार प. पू. श्याम नारायणदासजी चौबे यांच्या रसाळ वाणीतून संत श्री गुलाबराव महाराज चरित्र कथा होणार असून, सायंकाळी 5:30 वाजता मुख्य पोस्ट ऑफिस रोडवरील साई डायग्नोस्टिक सेंटर येथे पालखीचे आगमन होणार आहे. या ठिकाणी पादुकाचे पाद्यपूजनानंतर रूपम हॉलपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार असून, मंगळवार दि. 11 नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी सकाळी 8.30 ते दुपारी 2 या वेळेत संत गुलाबराव महाराज पारायण ग्रुप आणि माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “गुलाब गौरव” ग्रंथाचे सामूहिक पारायण होणार आहे. त्यात सर्वधर्मीय महिला, पुरुष, युवक- युवतींना सर्वांना सहभागी होता येईल. या ठिकाणी पालखी मुक्कामी राहणार असून, बुधवारी ती श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान करणार आहे.
श्री गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. गुलाबराव महाराज यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केलेले आहे. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वऱ्हाडी बोलीतून त्यांनी 133 ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्मयप्रकार त्यांनी हाताळले. 27 हजार ओव्या, 2500 अभंग, 2500 पदे, 3000 श्लोकादी रचना इत्यादींचा त्यांत समावेश आहे.
सामूहिक पारायणामध्ये सहभागी होण्यासाठी निर्मला साबू व विजया मोहता यांच्याकडे नाव नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संत गुलाबराव महाराज पारायण ग्रुप आणि माहेश्वरी महिला मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.