श्री बजरंग गणेश मंडळाने साकारला
भव्य राजवाड्याचा ऐतिहासिक देखावा
जालना/प्रतिनिधी/ जालन्याचा राजा व मानाचा दुसरा गणपती श्री बजरंग गणेश मंडळातर्फे जालना शहरातील कॉलेज रोडवर प्रथमच भव्य आणि ऐतिहासिक देखावा उभारण्यात आला असून, या देखाव्यातील राजवाड्याची नाजूक व उत्कृष्ट कारीगिरी जालनकरांना आकर्षित करत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळातर्फे पूर्ण दहा दिवस महाप्रसादाचे वाटप होणार असून, श्रद्धाळूंना या दिव्य सोहळ्याचा लाभ घेता येणार आहे. जालन्यातील राजा म्हणून ओळखला जाणारा श्री बजरंग गणेश मंडळ यंदा 76 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या मंडळाच्या गणेशोत्सवाची सुरुवात रविवार, दि. 17 ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य आगमन मिरवणुकीने झाली. ढोल-ताश्यांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक संपन्न झाली. 27 ऑगस्ट रोजी श्रीच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाने 30 फूट उंचीची श्रीगणेश मूर्ती स्थापित केली असून ती मुंबईच्या प्रसिद्ध सिध्दीविनायक आर्टस् या कलाकार समूहाने साकारलेली आहे.
जालन्यातील नागरिकांसाठी हा सोहळा ऐतिहासिक ठरणारा असून, जालनेकरांनी ऐतिहासिक राजवाड्याचा देखावा पाहण्यासाठी आवश्यक मंडळाला भेट द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओम धोका, उपाध्यक्ष प्रतीक अग्रवाल, सचिव राकेश ठाकुर यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.