सेलू , जालना आणि भोकर रेल्वे स्थानकावर स्थानकावर “अमृत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन केले
स्वच्छ भारत अभियान – विशेष मोहीम 5.0 तसेच “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत दिनांक 30 ऑक्टोबर 2025 सेलू आणि जालना येथे आणि दिनांक 31 ऑक्टोबर ला भोकर रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान – विशेष मोहीम 5.0 अंतर्गत पार पडला.
या कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांचा स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे तसेच विकसित भारत मिशन आणि पंच प्राण या राष्ट्रीय संकल्पनांबद्दल जागृती निर्माण करणे हा होता. या पंच प्राणांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे –
1. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविणे,
2. वसाहतवादी मानसिकतेचे अंश दूर करणे,
3. आपल्या संस्कृती चा अभिमान बाळगणे,
4. एकता आणि ऐक्याची भावना अधिक दृढ करणे,
5. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे.
“अमृत संवाद” हा कार्यक्रम म्हणजे रेल्वे प्रशासन आणि प्रवासी यांच्यातील थेट संवादाचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून प्रवाशांकडून सूचना, कल्पना आणि अभिप्राय मिळवून प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा आणि स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात.
स्वच्छता भारत अभियान – विशेष मोहीम 5.0 अंतर्गत नांदेड विभागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, ज्यामध्ये स्थानक परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्रवासी सुविधा, तसेच रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती यावर भर देण्यात आला आहे.
रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक सेवा संस्था असून, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रसार करण्यामध्ये रेल्वेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वे प्रशासनाने तर्फे सर्व प्रवाश्यांना आव्हान करण्यात येते की प्रवासादरम्यान स्वच्छतेची सवय लावावी आणि सार्वजनिक संपत्तीचे जतन करावे.
या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था (NGO), प्रवासी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रवाशांनी स्थानक स्वच्छता, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, तक्रार निवारण व्यवस्था, तसेच गाड्यांच्या वेळपालनाबाबत सूचना दिल्या.
नांदेड विभाग “विकसित भारत @2047” या संकल्पनेच्या दिशेने कटिबद्ध आहे आणि स्वच्छ भारत अभियान – विशेष मोहीम 5.0 तसेच अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत प्रवासी सुविधा, सुरक्षा व स्वच्छतेच्या उच्च मानकांचे पालन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
