शेतकऱ्यांचा संयम संपला; मराठा
महासंघ रस्त्यावर उतरणार-देशमुख
बच्चू कडू यांचे आमरण उपोषण व दिलीप राठी यांच्या नेतृत्वातील आंदोलनास पाठिंबा
जालना/प्रतिनिधी/ एकीकडे अमरावती येथे आमदार बच्चू कडू कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे जालन्यात समृद्धी महामार्गाच्या जमिनीबाबत अन्यायकारक भरपाईविरोधात दिलीप राठींच्या नेतृत्वात 300 गावातील शेतकरी सव्वा महिन्यापासून आंदोलन करत आहे. तरीदेखील सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याने, या दोन्ही आंदोलनास मराठा महासंघाने ठाम पाठिंबा दर्शवत, शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर महासंघाची आंदोलनशैली सरकारला परवडणारी ठरणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्यासह जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ, युवक जिल्हाध्यक्ष ॲड. शैलेश देशमुख, जिल्हा समन्वयक लक्ष्मण उढान, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे इंजी. शुभम टेकाळे, कामगार जिल्हाध्यक्ष मंगेश मोरे आदींनी शुक्रवार दि. 13 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विधवा-दिव्यांगांना मानधन, शेतमालाला 20 टक्के अनुदान, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत आदी मागण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले असून, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे तर दुसरीकडे, जालना येथे समृद्धी महामार्गासाठी बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प भरपाईमुळे 300 गावांतील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या मुद्द्यावर दिलीप राठी यांच्या नेतृत्वाखाली सव्वा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांनी लेकरा बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली, आता रस्ता रोकोचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वीच आंदोलकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा संयम सुटत चालला असून, तरीदेखील सरकार झोपेचे सोंग घेत असल्याने संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता या आंदोलनाला मराठा महासंघाने पाठिंबा दर्शविला असून, या मुद्द्यावर आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. शासनाला जाग येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा खणखणीत इशारा या शिष्टमंडळाने निवेदनात दिला आहे.