सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या
बुलेटस्वारांवर कारवाईची “संक्रांत”
वैजापूर पोलिसांनी केला आठ हजाराचा दंड वसूल
वैजापूर :- बुलेटच्या सायलेंसर मधून फटाक्यासारख्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांची झोपमोड करणाऱ्या बुलेटस्वारांवर वैजापूर पोलिसांकडून बुधवारी कारवाईची “संक्रांत” ठरली.
रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या आणि सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून दणका दिला. वैजापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सत्यजीत ताईतवाले यांच्या नेतृत्वाखाली शहरात ही धडक कारवाई करण्यात आली असून, यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत.
वैजापूर शहरात आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री तसेच दिवसादेखील काही दुचाकीस्वार, विशेषतः बुलेट धारक, त्यांच्या गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून मोठा आवाज करत फिरत असल्याचे दिसून येत होते. या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि विशेषतः रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. या त्रासाबाबत नागरिकांकडून पोलिसांकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली आणि शहराच्या मुख्य चौकांमध्ये सापळा रचला.पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेदरम्यान एकूण ८ बुलेट वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णासिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक नितीन. जे.नलवडे, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस अंमलदार अविनाश भास्कर, रावसाहेब रावते, कुलदीप नरवडे, प्रशांत गिते, प्रल्हाद जटाळे, अभिजीत डहाळे,अमोल कांबळे यांनी केली.