Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादसार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा 

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

          गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

          गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घेण्यात यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या स्थानिक नियंत्रण कक्षांचे 7066042412 (छत्रपती संभाजीनगर शहर मंडल), 7875756652 (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडल), 7875764144 (जालना मंडल) क्रमांक ग्राहकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली आहे.

अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments