सर्वसामान्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव!प्रारूप याद्यांवरील हरकती गांभीर्याने घ्या;डॉ.हुलगेश चलवादींचे आवाहन
पुणे:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्यांचा घोळ अद्यापही कायम आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप याद्यांसंदर्भात तक्रारींचा पाऊस पडतोय.जोपर्यंत मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदारांची नावे कमी केली जात नाही; तोपर्यंत निवडणुकांमध्ये या याद्या वापरू नका,असे आवाहन बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.३०) दिला.सर्वसामान्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचा दावा यानिमित्ताने त्यांनी केला.
प्रभाग क्रं.२ फुलेनगर-नागपूर चाळच्या मतदार यादीत इतर प्रभागातील मतदारांचे नावे समाविष्ठ करण्यात आले आहे. यासंदर्भात पुणे मनपा आयुक्तांकडे हरकत नोंदवण्यात आल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. मुळ मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र आहे.मतदार यादी तयार करण्याचे काम देण्यात आलेल्या एजेन्सीने योग्यपद्धतीने काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
वडगाव शेरी मतदार संघातील प्रभागात शिरूर येथील रहिवाशांची नावे आहेत. प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करीत आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे इतरत्र प्रभागात टाकण्यात आले आहेत. पूर्वी ईव्हीएमचा घोळ आणि आता मतदार यादीचा घोळ राज्यातील सत्ताधाऱ्यांना पोषक ठरत असल्याचा आरोप डॉ.चलवादींनी केला.
अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात अथवा त्याच प्रभागात एकापेक्षा जास्त वेळा समाविष्ठ करण्यात आले आहे. राज्यातील विविध प्रभागांमध्ये दुबार मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे.एवढी मोठी संख्या निवडणुकीचे निकाल आणि मतदानाची आकडेवारी बदलू शकते. प्रारूप याद्यांवरील हरकतींना त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा बसपाच्या आंदोलनाला समोर जावे, असा इशारा डॉ.चलवादींनी दिला. एकट्या मुंबईत ११ लाखांहून अधिक दुबार मतदार आढळून आले आहेत. राज्यातील २९ महानगरपालिकेचा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी घोळ दुरूस्ती करेपर्यंत निवडणुका घेणे म्हणजे नागरी अधिकारांची पायमल्ली असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
