संत शिरोमणी नामदेव महाराज
संत शिरोमणी नामदेव महाराज यांची काल २६ ऑक्टोबर रोजी जयंती होती. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी गावात एका गरीब शिंपी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाम दामाशेठी तर आईचे नाव गोनाई असे होते. त्यांना एक बहिणही होती तिचे नाव आऊबाई असे होते. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा विवाह राजाबाईशी झाला. त्यांना चार मुले व एक मुलगी होती. मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असणारे नामदेव महाराज मात्र विठ्ठल भक्तीत लिन असायचे. लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. विठ्ठल हेच त्यांच्यासाठी सर्वकाही होते. देव, आईबाप, गुरू, सखासोयरा, स्वामी तोच होता. विठ्ठल भक्तीत ते इतके लिन असायचे की साक्षात विठ्ठल त्यांना भेटायला यायचे असे म्हटले जाई. त्यांच्या हट्टापायी विठ्ठलाने त्यांच्या घरी येऊन दुधाच्या नैवेद्याचे सेवन केले होते अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. एकदा एका कुत्र्याने त्यांच्या घरी येऊन रिकामी वाटी पळवली तेंव्हा तेंव्हा कुत्र्याला भूक लागली असून वाटीत तर काहीच नाही म्हणून ते कुत्र्याच्या मागे सुकी भाकर आणि तुपाची वाटी घेऊन त्याला देण्यासाठी त्याच्या मागे धावत होते. लहानवयातच सर्वांभूती परमेश्वर ही भावना त्यांच्यात दिसून आली. लहानपणापासूनच विठ्ठलाचे भक्त असलेल्या नामदेवांनी सत्य समजून घेण्यासाठी वेदज्ञ ब्राह्मणांकडे हेलपाटे मारले पण नामदेव हे शूद्र जातीचे असल्याने त्यांना ब्रह्म जाणून घेण्याचा अधिकार नाही असे सांगून त्यांना ज्ञान घेण्यापासून रोखण्यात आले. तेंव्हा त्यांनी भक्तीतून थेट परमेश्वरलाच आधार मानून स्वतःच बुद्धीचा कस लावत विश्वाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ते लंगोटी नेसून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करत सदविचारांचा प्रसार करू लागले. ही वाट त्यांना स्वतःच शोधायची होती. त्यातून साधनेची नवीनवी साधनं निर्माण होऊ लागली. श्रोत्यांनाही समजून घेणारी वारकरी सामूहिक कीर्तनाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. त्यासाठी त्यांनी अभंग या छंदाची निर्मिती केली. नामदेवांनीच वारकऱ्यांच्या लाडक्या काल्याच्या कीर्तनाची सुरुवात केली. नामदेव महाराजांना अभंग लेखनाचा इतका छंद जडला की त्यांनी जवळपास १ कोटी अभंग लिहिले. याचाच अर्थ त्यांनी विपुल साहित्य लेखन केले. त्यांच्या साहित्याची भाषा खूप सोपी होती. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चांगदेव या त्यांच्या समकालीन संतांच्या तुलनेत आज आपल्याला त्यांची भाषा लगेच कळते. त्यांनी कायम सर्वसामान्यांसाठी लिहिले. त्यात संवाद आहे. नाट्य आहे. लोककलांचे विविध प्रकार आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतरही नामदेवांनी तीर्थयात्रा करून रामेश्वरापासून मुलतान पर्यंतचा भारत पालथा घातला. जे जिथे गेले तिथले बनले. त्यांनी तिथल्या स्थानिक भाषेत लोककाव्य लिहिले. त्यांनी हिंदी साहित्याला नवा आयाम दिला. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहता अशी संताची मांदियाळी देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकांहून अधिक काळ राहिले. शीख धर्माच्या गुरु ग्रंथासाहेब या पवित्र ग्रंथात त्यांची ६१ पदे समाविष्ट आहेत. पंजाबात आजही त्यांच्या अभंगाचे नियमित वाचन केले जाते. पंजाबातच नाही तर संपूर्ण देशात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महाराष्ट्र आणि पंजाब बरोबरच राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यात त्यांची मंदिरे आहेत. तामिळनाडू पासून काश्मीरपर्यंत लाखो लोक त्यांचे नाव किंवा आडनाव किंवा जातीची ओळख अभिमानाने मिरवतात. संपूर्ण देशात प्रभाव असणारे नामदेव हे एकमेव संत आहेत म्हणूनच त्यांना संत शिरोमणी असे म्हणतात. ३ जुलै १३५० रोजी वयाच्या ८० व्या वर्षी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपुरात विठ्ठलाच्या पायरीशी आहे तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येतात आणि नतमस्तक होतात.
-श्याम ठाणेदार