संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, टाळकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात
मांसाहार विक्री बंदी करून तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात असे वक्तव्य करून वारकरी, धारकरी, टाळकरी, भागवत, नाथ संप्रदायाचा अपमान केल्याबद्दल उबाठाचे खा. संजय राऊत यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी श्री. राऊत यांना केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते. महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून वारकरी, टाळकरी, धारकरी, नाथ संप्रदाय, माळकरी हे सर्व समाज शाकाहार करतात मग हे सारे संप्रदाय नपुंसक आहेत का असा घणाघाती हल्ला श्री. बन यांनी चढविला.
श्री. बन म्हणाले की, राजकारण जरूर करा पण वारकरी परंपरा, महानुभाव पंथाचा, भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. भारतीय जनता पार्टी असे प्रकार कधीच सहन करणार नाही. नाथ संप्रदाय पराक्रमी होता. या संप्रदायाने अनेक युद्ध जिंकली आहेत. असे हीन बोलू लागलात तर तुम्हाला मर्दानगी काय असते हे महाराष्ट्र दाखवून देईल असा इशाराही श्री. बन यांनी दिला. येत्या काही दिवसांत, काही तासांत या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
सामनामधील अग्रलेखावरूनही श्री. बन यांनी श्री. राऊत यांचा समाचार घेतला. महायुती सरकारमध्ये कु ची बाराखडी सुरू आहे, हे बेजबाबदारपणाचे वक्तव्य असून कु ची बाराखडी म्हणजे कुचकामी, कृतघ्न, कुविचारी, कुसंस्कारी, कुरघोडीखोर, कुप्रसिद्ध ही बाराखडी उबाठांना आणि श्री. राऊत यांना चपखल लागू होते अशी खिल्ली उडवली. आजमितीला महायुती सरकारकडून सर्वदूर विकासाची कामे सुरू असून विकासाची बाराखडी सुरू आहे असे श्री. बन म्हणाले. महायुती सरकारच्या विकासाची बाराखडीच पत्रकारांसमोर श्री. बन यांनी सादर केली. अ अटल सेतूचा, ब बीडीडी चाळ पुनर्विकासाचा, क कोस्टल रोड चा, ड धारावी पुनर्विकासाचा, ई इलेक्ट्रिफिकेशन धोरणाचा, क कलानगर उड्डाणपुलाचा, म मेट्रो कामांचा, डब्लू वाढवण बंदराचा, एक्स एक्सप्रेस वे चा, झेड झोपडपट्टी विकासाचा, अशी वेगवान घोडदौड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार करत असून कु ची बाराखडी तुम्हाला लागू होते असेही श्री. बन यांनी सांगितले.
श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी विकासाची अनेक कामे करत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास, मेट्रो प्रशिक्षण संस्था, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड, मालवणी सरकार कर्मचारी निवासस्थान, कलानगर उड्डाणपूलाचे उद्घाटन ही होत आहे. महायुती सरकार उत्तमरित्या विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. ही कुरघोडीची बाराखडी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय रहाणार नाही तुम्हाला तुमची जागा जनता नक्की दाखवेल असेही त्यांनी नमूद केले.
