Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादरोटरी क्लबच्या शांती सप्ताहाने जनतेच्या मनात खोलवर रुजविला शांततेचा संदेश

रोटरी क्लबच्या शांती सप्ताहाने जनतेच्या मनात खोलवर रुजविला शांततेचा संदेश

रोटरी क्लबच्या शांती सप्ताहाने जनतेच्या
मनात खोलवर रुजविला शांततेचा संदेश
जालना/प्रतिनिधी/  रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे 21 सप्टेंबर या जागतिक शांतता दिनानिमित्त 15 ते 21 सप्टेंबरदरम्यान आयोजित शांती सप्ताह अंतर्गत शांतीस्तंभ स्थापना, ध्यान साधना शिबिर, निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, शांती रॅली, स्वाक्षरी अभियान, शांततेची प्रतिज्ञा आदी उपक्रम राबवून समाजमनात शांततेचे महत्त्व दृढ करण्यात आले.
     या उपक्रमांची सुरुवात 15 सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा रोडवरील स्व. बाबुराव काळे चौकात शांतीस्तंभ उभारणी व घनवन प्रकल्प लोकार्पणाने झाली. शांतीचा संदेश वृक्षारोपणातून समाजात रुजविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
     संपूर्ण आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत “शांततेशिवाय जगण्याचा पर्याय नाही” हा संदेश विविध अंगाने प्रभावीपणे मांडला. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी समाजातील संघर्ष, हिंसाचार आणि तणावाला शांततामय मार्गाने उत्तर देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगांच्या माध्यमातून युद्धमुक्त जग, बंधुभाव, एकात्मता आणि अहिंसेचे विचार मांडत शांततेचे रंग जागवले.
    याशिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगचे अरुण मोहता यांनी श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ध्यान शिबिर घेतले. महावीर स्थानकवाशी जैन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शांततेची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच भव्य शांतता रॅली काढण्यात आली. हॅण्ड प्रिंट उपक्रम व स्वाक्षरी मोहिमेत विद्यार्थी, नागरिक आणि क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
      समारोप प्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्ष वर्षा पित्ती यांनी आपल्या भाषणात शांततेचे सार्वत्रिक महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, रोटरी ही संस्था सात प्रमुख उद्दिष्टांवर काम करते आणि त्यापैकी शांतता हे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला या स्पर्धा केवळ स्पर्धा न ठरता विद्यार्थ्यांमधील शांततेची खरी जाण व विचारांची खोली आत्मसात करण्याचे साधन ठरली आहे. शांततेची खरी सुरुवात मनातून होते; ती कुटुंब, समाज आणि अखेरीस संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरते. या आठवड्याचे उपक्रम म्हणजे भावी पिढ्यांना संघर्षाऐवजी संवादाची, तणावाऐवजी समाधानाचे आणि दुश्मनीऐवजी मैत्रीची शिकवण देणारे पाऊल ठरले आहे.
     कार्यक्रमात क्लबचे सचिव लक्ष्मीनिवास मल्लावत, प्रकल्प प्रमुख शिवरतन बगडिया, रमेश मगरे, हेमंत ठक्कर, जितेंद्र अग्रवाल, डॉ. दीपक बगडिया, अरुण मोहता, सुरेश मगरे, अरुण अग्रवाल, अनिल कुलकर्णी आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments