रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी
जालना/प्रतिनिधी/ मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जालना तालुक्यातील रोहणवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात तसेच घरात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी ज्ञानेश्वर (माऊली) उगले यांनी केली आहे.
या अतिवृष्टीची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली. यावेळी महसूल अधिकारी नारायण डाके, ग्रामपंचायत अधिकारी कोथळकर, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती खांडेभराड यांनी हजेरी लावून पिकांचे पंचनामे केले.
याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकरी आप्पासाहेब साळसे, दत्ता तनपुरे, बाबासाहेब चाळसे, जपालसिंग बुंदले, किसन उगले, सतीश बुंदले, अजिंक्य उगले, अंकुश बागराज, अण्णासाहेब तनपुरे, गुड्डू शेठ, विठ्ठल काळे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची दैना लक्षात घेता तात्काळ मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन करून शासनाने तत्पर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
