Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादवेरुळमध्ये महार समाजासाठी असलेल्या गायरान जमिनीवर अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून बेकायदेशीर खरेदी? – आरपीआय...

वेरुळमध्ये महार समाजासाठी असलेल्या गायरान जमिनीवर अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून बेकायदेशीर खरेदी? – आरपीआय (आठवले)कडून चौकशीची मागणी

वेरुळमध्ये महार समाजासाठी असलेल्या गायरान जमिनीवर अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून बेकायदेशीर खरेदी? – आरपीआय (आठवले)कडून चौकशीची मागणी

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील गट क्र. ६८७ व ६८९ या गटातील वर्ग-२ (प्रतिबंधित सत्ता प्रकार) जमिनीवर कृषी आयुक्त रावसाहेब भागडे व माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी खरेदीखत करून बेकाय देशीररित्या जमिनी विकत घेतल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने केला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यां पासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदन सादर करत चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, वेरुळ येथील गट क्र. ६८० ते ६९० या जमिनी पूर्वी सरकारकडून महार समाजातील लोकांना उपजीविकेसाठी वाटप करण्यात आलेल्या होत्या.या जमिनींचे मूळ स्वरूप वर्ग-२ असून त्यावर खरेदी-विक्रीस बंदी आहे.मात्र,महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करून बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमा नुसार संरक्षित असलेल्या गायरान जमिनींचा उद्देशच मोडीत काढल्याचे स्पष्ट होते.मंडळ अधिकारी वेरुळ यांनी १२ एप्रिल २०२४ रोजी तहसिलदारांना दिलेल्या अहवालात ही संबंधित गट वर्ग-२ व गायरान असल्याचा उल्लेख असून ही, यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याचे गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले. इतकेच नव्हे तर, जिल्हा किंवा तालुका निबंधक कार्यालयाला या व्यवहारांवर बंदी घालण्याचे आदेश तहसिल कार्यालया कडून आजतागायत देण्यात आलेले नाहीत. यामुळे आजही संबंधित गटांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या गटांमध्ये अनेक सुवर्णवर्गीय व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून होटेल्स, लॉजिंग,रेस्टॉरंट या सारखे व्यवसाय सुरू केले आहेत.ही सर्व स्थापनं स्थानिक किंवा जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण व नगर रचना विभागाने सदर जागा वाहनतळ म्हणून घोषित केलेली असून ही तिथे खासगी व्यवसाय सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्या पत्नी सौ. स्मिता भागडे व माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांचे पुत्र आकाश शिंदे यांनी अनुक्रमे गट क्र. ६८७ व ६८९ मधील १० व १३ आर क्षेत्र विकत घेतले आहे. त्याचबरोबर सौ. स्मिता भागडे यांच्या नावे वेरुळ,वाळूज खुर्द, वाळूज बु. येथील १५ एकरांहून अधिक स्थावर मालमत्ता असल्याचे निवेदनात दिले आहे.तसेच फुलंब्री-खुलताबाद रोडवरील वरद पेट्रोलियम पंप ही त्यांच्या नावे असल्याचे सांगण्यात आले आहे.
गायकवाड यांनी कृषी आयुक्त भागडे यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.पदाचा दुरुपयोग करून नियमांचे उल्लंघन करत संपत्ती जमविल्याचा आरोप करत, सौ. स्मिता भागडे यांच्या नावा वरील सर्व स्थावर-जंगम मालमत्तांची चौकशी करून ती शासन खात्यात जमा करण्यात यावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments