रायगड जिल्हा परिषद शाळा तळे मराठी, केंद्र तळे, तालुका तळा आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
बोरघर/माणगाव/ तळे मराठी शाळेतील विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तळे मराठी शाळेच्या सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर गोळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध आरोग्य दूत डॉ. सतीश वडके, बँक ऑफ इंडिया चे निवृत्त शाखाधिकारी व लेखक श्री सुनील कुळकर्णी, माणगाव येथील पत्रकार विश्वास गायकवाड, निवृत्त केंद्रप्रमुख संदीप जामकर, दिपक ठाकूर सामाजिक कार्यकर्ते जगदीश गोळे तसेच तळे केंद्राचे केंद्रप्रमुख मुबीन वासकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शाळेतील मुलींनी ईशस्तवन व स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने शाल पुष्पगुछ व श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ. वडके, श्री कुलकर्णी व पत्रकार गायकवाड यांनी आपले अनुभव सांगताना मोलाचे मार्गदर्शन केले. गेली सलग सहा वर्ष तळे मराठी शाळेतील मुलांनी नवोदय परीक्षा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात टॉप केले आहे. तळे शाळेचे २५ विद्यार्थि नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असून ६० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाले आहेत व त्यापैकी ३० विद्यार्थी जिल्हा मेरिट मध्ये शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. याचा शाळेला नक्कीच अभिमान वाटत आहे. २०२४/२५ मध्ये २४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १८ विद्यार्थी पात्र झाले आणि ९ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले तसेच ३ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड झाली त्या सर्वाना सन्मानचिन्ह पुस्तक पेन प्रमाणपत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरटिएस रायगड परीक्षेत २ विद्यार्थ्यांनी यश मिळवले त्यांचा सन्मान करण्यात आला. वर्षभरात घेण्यात आलेल्या गणित संबोध, होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा मंथन प्रज्ञाशोध परीक्षा या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून पूर्ण वेळ मोफत मार्गदर्शन करणारे आणि या शाळेचा नाव लोकिक वाढवणारे शिक्षक सुनील बैकर सर यांचा शा. व्य समिती व सहकारी शिक्षक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर गोळे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. मुलांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दल विचार मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर यांनी केले. सूत्रसंचालन मितल वावेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल बैकर यांनी केले. सत्कार कार्यक्रमासाठी पालकांनी आर्थिक साहाय्य केले तसेच माडी, कोळी, गुरव, निकम, यांनी व्यवस्थापन ची धुरा सांभाळली. पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादत एक उत्तम कार्यक्रम संपन्न झाला.