रायगड जिल्हा परिषद शाळा बोरघर येथे स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा
बोरघर /माणगाव/ पंधरा ऑगस्ट अर्थात आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन, याच दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला होता. ब्रिटिशांनी आपल्या देशावर तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. ब्रिटिशांची ही जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी आपल्या देशातील असंख्य क्रांतिकारक देशभक्तांनी आपल्या सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या अनमोल प्राणांची आहुती दिली. देशभक्तीने प्रेरीत झालेल्या भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या निधड्या छातीवर क्रुर जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बंदुकीतील गोळ्या झेलल्या तर काही हसतहसत फासावर चढले, काहींनी अनन्वित छळ आणि यातना सहन केल्या पण कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली नाही. त्यांच्या या महान बलीदान त्याग आणि समर्पणामुळेच आपल्या भारत देशाला हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि ब्रिटिश राजवटीचे प्रतिक असलेल्या युनियन जॅक च्या जागी भारतीय तिरंगा डौलाने फडकू लागला.भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आले.
तेव्हा पासून १५ ऑगस्ट देशातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी क्षेत्रात मोठ्या उत्साहात १५ ऑगस्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२५ रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा बोरघर येथे स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.१५ ऑगस्ट रोजी सकाळी बोरघर शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी चे विद्यार्थी, शिक्षक,पालक , ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक समिती आणि गावातील तमाम शिक्षण प्रेमी यांच्या समवेत गावातील प्रमुख रस्त्यांवरुन प्रभातफेरी काढून जयघोष आणि देशभक्तीपर गीते म्हणत शाळेच्या प्रांगणात एकत्र येऊन पत्रकार विश्वास गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, सर्वांनी सन्मान पूर्वक राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत,देशभक्तीपर गीत व तद्नंतर विद्यार्थ्यांचे कवायत प्रकार घेण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित वर्गात गेले. तद्नंतर स्त्री शिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन, ईशस्तवन, स्वागत गीत त्यानंतर शाळेचे उपक्रमशील विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक दिनेश आवटे आणि उपक्रमशील विद्यार्थी प्रिय सहशिक्षक नानासाहेब ढोले यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून यथोचित स्वागत केले.
त्यानंतर चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांची कौतुकास्पद आणि उल्लेखणीय भाषणं, उपस्थित मान्यवरांचे मनोगत, शिक्षक वृंदांचे मनोगत आणि तद्नंतर चॉकलेट वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.