शिवराज्याभिषेकाचा अपमान करण्याऱ्या भिडेंचा ॲड. शंकर चव्हाण यांच्याकडून तीव्र निषेध
भिडे यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून, अनेक शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि समाजातील सर्व स्तरांतून या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. शंकर चव्हाण यांनी ट्विटरवरून आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “६ जूनचा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव आहे. भिडे किंवा त्यांच्यासारखे कितीही जन्माला आले, तरी हा सोहळा बंद होणार नाही. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि यावर कोणीही घाला घालू शकत नाही. चला मावळ्यांनो, लागा तयारीला – चलो किल्ले रायगड ६ जून.
राज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर राजर्षी परंपरेत राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना केली. हजारो वर्षे अन्याय, शोषण आणि अपमान सहन केलेल्या समाजासाठी हे स्वराज्य नवजीवन होते.
भिडे यांच्या वक्तव्यांमुळे वारंवार वाद निर्माण होतात. ही पहिली वेळ नाही की भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण केली आहे. यापूर्वीही त्यांनी महिलांबाबत, संत विचारांबाबत आणि ऐतिहासिक घटनांबाबत गैरसमज पसरवणारी विधाने केली आहेत. अशा वक्तव्यांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण होते आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातात.
ॲड. शंकर चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “समाजाला फोडणारे, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारे भिडे यांनी तोंडाला लगाम घालावा. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत. अशा व्यक्तींनी स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी वारंवार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या पवित्र परंपरेचा अपमान करणे, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही.” त्यांनी सरकारला इशारा दिला की, “अशा समाजविघातक वक्तव्यांवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा शिवप्रेमींच्या रोषाची जबाबदारी शासनावर राहील.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी रायगड किल्ल्यावर लाखो शिवभक्त एकत्र येऊन अभिवादन करतात. या वर्षीही हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी हजारो शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. ॲड. शंकर चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटद्वारे ‘चलो किल्ले रायगड’चा निर्धार पुन्हा एकदा शिवप्रेमींमध्ये जागवला आहे.
आजच्या पिढीला खरी प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अपमानास्पद टीका थांबवणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेसाठी अशा प्रवृत्तींना वेळेत रोखणे हे समाजाच्या हिताचे आहे. राज्याभिषेक सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भिडे गुरुजी आणि अशा प्रकारचा विषारी प्रचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि हजारो मावळ्यांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. यामध्ये कुठलाही अपमान सहन केला जाणार नाही, असा ठाम निर्धार शिवप्रेमींनी केला आहे.

