राजे शहाजी वरिष्ठ महाविद्यालयास अंबेलोहळ शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणात ‘बी’ ग्रेड
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संलग्नित कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित राजे शहाजी वरिष्ठ महाविद्यालय, अंबेलोहळ यांना शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ए.ए.ए.) प्रक्रियेमध्ये ‘बी’ ग्रेड प्राप्त झाला आहे. ही अंकेक्षण प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत दर तीन वर्षांनी सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण करण्यात येते. यामध्ये महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यपद्धती, भौतिक सोयी-सुविधा, विद्यार्थी विकास उपक्रम, संशोधन, विस्तार कार्य तसेच गुणात्मक घटकांचा सखोल आढावा घेतला जातो.
यावेळी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष महाविद्यालयास भेट देऊन सर्व बाबींची काटेकोर व पारदर्शक पद्धतीने तपासणी केली. सदर अंकेक्षण पूर्णतः नॅक (NAAC) मूल्यांकन निकषांवर आधारित होते. या सर्व प्रक्रियेत राजे शहाजी वरिष्ठ महाविद्यालयाने समाधानकारक कामगिरी बजावत ‘बी’ ग्रेड संपादन केला.
या यशामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीदादा बनकर पाटील व संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. गणेश बनकर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणाचे समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी केसकर यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले. तसेच सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले आहे.
महाविद्यालयास मिळालेल्या या यशाबद्दल परिसरातील नागरिक, पालक, माजी विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
