Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादजिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या...

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक

‘राह-वीर रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या

योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर :- रस्ते अपघात प्रसंगी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन सेवाभावी कार्य करणाऱ्या मृत्युंजय दुतांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी लोकांपर्यंत ‘राह-वीर’ योजनेची माहिती पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे,  कार्यकारी अभियंता श्रीमती प्रिया पुजारी, सहा. अधीक्षक अभियंता पूजा रावळे, उपविभागीय अभियंता श्रीराम ढाकणे, डी.एम. कोलते, मनपा कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी,  जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सारिका लांडगे, डॉ. महेश लड्डा, , सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप शेलर, पोलीस निरीक्षक महामार्ग विभाग किशोर चौधरी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अनिकेत कुलकर्णी, उपआयुक्त वाहतुक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक वाहतुक आनंद झोटे आदी मुख्यालयातून तर सेव्ह लाईफ फाऊंडेशन चे निलेश साळूंखे, गौतम सिंग, वैष्णवी कारेकर आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

संयुक्त उपाययोजनांवर भर

सेव्ह लाईफ फाऊडेशन या संस्थेने सन २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार,   जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे आहेत. जिल्ह्यात शून्य अपघात अभियान राबविण्याच्या दृष्टिने उपाययोजना राबविणे अपेक्षित असून त्यासाठी अपघातप्रवण स्थळांवरील अपघात प्रवणता निर्मूलन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,महानगरपालिका, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग अशा सर्व विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवावयाच्या आहेत.

भौगोलिक स्थान माहिती सेवा देणार

जिल्ह्यात नक्की करण्यात आलेल्या अपघातप्रवण स्थळांचे भौगोलिक अंकन करण्यात आले आहे. त्या अंकनाची माहिती भौगोलिक स्थान माहिती सेवा पुरविणाऱ्या संस्थांना द्यावी. त्यानुसार वाहन चालक वाहन चालवितांना या सेवांचा वापर करेल व  रस्त्यात पुढे येणाऱ्या अपघातप्रवण स्थळाबाबत त्यास आगाऊ सुचना मोबाईलद्वारे दिली जाईल.तसेच रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तिंना अपघात झाल्यापासून ते प्रत्यक्ष उपचार मिळण्याचा कालावधी हा कमीत कमी करण्याबाबतही उपाययोजना कराव्या. त्यासाठी १०८ क्रमांक रुग्णवाहिकांची व्यवस्था सुसज्ज असावी.

मृत्युंजय दुतांना २५ हजार रुपयांचे बक्षीस

अपघात प्रसंगी मदत करण्यासाठी अनेक लोक उगाच चौकशीचा ससेमिरा मागे लागेल म्हणून मदत करण्याचे टाळतात. मात्र अशा मदत करणाऱ्या मृत्युंजय दुतांना ‘राह-वीर’ या योजनेत २५ हजार रुपये इतके बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन  रस्ते अपघातप्रसंगी मदत करण्यासाठी लोक पुढे येतील,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. तसेच त्यासाठीची जिल्हास्तरीय समितीही गठीत करावी,असे निर्देशही त्यांनी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments