परतुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महिला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा २०२५ उत्साहात मोठ्या संख्येने साजरा करण्यात आले
दैनिक आताच एक्स्प्रेस
प्रतिनिधी /आष्टी/ महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्याने आणि विचारांनी समाजाला प्रेरणा दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या. अठराव्या शतकात पुरुषप्रधान समाजात स्वतःच्या बुद्धिमत्तेने, धैर्याने आणि प्रजाहितदक्षतेने माळवा प्रांतावर राज्य करणाऱ्या अहिल्याबाईंनी नारीशक्तीचा आदर्श घालून दिला. अहिल्याबाईंनी निष्पक्ष आणि प्रजाहितदक्ष प्रशासन प्रस्थापित केले. गावोगावी पंच नेमून त्वरित न्यायदानाची व्यवस्था केली. करप्रणाली सौम्य करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.
डोंगरी भागातील भिल्ल आणि गोंड आदिवासींना कर वसुलीचा अधिकार देऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यांनी स्वतःच्या मुलाला रथाखाली वासराला चिरडल्याबद्दल शिक्षा ठोठावली, ज्यामुळे त्यांच्या न्यायनिष्ठेची ख्याती पसरली. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज दिनांक 29 रोजी परतूर येथील गजानन मंगल कार्यालयात महिला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद जालना आणि पंचायत समिती परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करताना आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. आ. बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड तहसीलदार श्रीमती प्रतिभा गोरे गटविकास अधिकारी राजेश तांगडे, महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी रमेश कोळेकर भाजपा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे , रमेश भापकर संपत टकले अशोकराव बरकुले , बद्रीनारायण ढवळे प्रवीण सातोनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माळवा प्रांतातील प्रजाहितदक्ष आणि निष्पक्ष प्रशासनाचा गौरव करण्यात आला. त्यांनी राबवलेली निःपक्षपाती न्यायव्यवस्था, शेतकऱ्यांसाठी सौम्य करप्रणाली, आणि भिल्ल-गोंड आदिवासींशी मैत्रीपूर्ण संबंध यांचे स्मरण करण्यात आले. त्यांनी विहिरी, तलाव, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि मंदिरांचे बांधकाम करून सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाला चालना दिली. सती प्रथेला विरोध, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांनी त्यांनी सामाजिक समतेचा आदर्श घालून दिला. महेश्वर येथील विणकर आणि कारागिरांना प्रोत्साहन देऊन त्यांनी उद्योगाला चालना दिली,
सोहळ्याच्या मुख्य आकर्षण ठरलेल्या महिला सन्मान पुरस्कार २०२५ अंतर्गत जालना जिल्ह्यातील महिला आणि स्वयंसेवी संस्थांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण, आणि बाल कल्याण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षण क्षेत्रातील शिक्षिका आणि बाल कल्याणासाठी योगदान देणाऱ्या संस्थांचा समावेश होता. प्रत्येक पुरस्कारप्राप्त व्यक्तीला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अहिल्यादेवींच्या पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समतेच्या कार्याला आधुनिक काळात लागू करण्याचे आवाहन केले. अहिल्यादेवींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण आजच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट केले.