नोटरींच्या कामात कायद्याचे पालन आणि
शिस्तबद्धता अपेक्षित-न्या. प्रसन्न वराळे
नोटरी दस्त करताना कोणाचे हक्क डावलेले जाणार नाही याची दक्षता घ्यावी- न्या. रेवती मोहिते
जालना/प्रतिनिधी/ नोटरींचे कार्य हे नोबल असून, शिस्तबद्धता व कायद्याचे काटेकोर पालन आवश्यक आहे. बदलत्या काळात माहिती-तंत्रज्ञानाचा जागरूक वापर करणेही अपेक्षित आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.
पुण्यातील चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवार (ता. 9) महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनतर्फे पाचवी नोटरी परिषद पार पडली, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्या. वराळे बोलत होते. परिषदेची सुरुवात संविधान दिंडीने झाली. या वेळी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे, न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस. के. महाजन, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. संजय दातीर पाटील, माजी न्यायाधीश हाजी सय्यद अजमत अली, ॲड. रवी गायकवाड, ॲड. अशोक ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी न्या. रेवती मोहिते-डेरे म्हणाल्या की, ऑनलाइन, डिजिटल नोटरी वर्कबाबत नोटरींच्या कार्यशाळा वेळोवेळी होणे अपेक्षित आहे. ॲड. खराडे यांनी संघटनेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती व मागील काळात केलेल्या कामाचा आढावा घेतला.
या परिषदेत नोटरी पदाचा दर्जा, व्यावसायिक सक्षमता, तांत्रिक सुधारणा यावर मार्गदर्शन झाले. 15 नोटरी वकिलांना विधी सेवा पुरस्कार देण्यात आले. परिषदेत वकिलांच्या कामकाजाशी निगडित महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले, त्यात वकिलांचे नोटरी सर्टिफिकेट व रिन्यूअल विनाविलंब करावे, नोटरी वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, पोलिसांनी नोटरी ॲक्टअंतर्गत मिळालेल्या संरक्षणात बाधा येणार नाही याची दक्षता घेणे, वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे होणे, नोटरी वकिलांना ओळखपत्र देणे, टोलमाफी, इन्शुरन्स फॅसिलिटी मिळणे, खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नये, या ठरावांचा समावेश आहे.
या परिषदेत जालना नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲड. महेश धन्नावत, ॲड. अशोक छाजेड, ॲड. आर. बी. मोरे, ॲड. वैभव खरात, ॲड. राजेंद्र चव्हाण, ॲड. शिवराम सतकर , महाराष्ट्र अँड गोवा नोटरी अससोसिएशनचे प्रवक्ते ॲड. पठाण साजीदखान अब्दुल मजीदखान, सदस्य ॲड. नसीर नजीरखान पठाण यांनी सहभाग नोंदवला.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी कार्यवाह ॲड. आतिश लांडगे, महिला अध्यक्ष ॲड. शोभा कड, ॲड. ज्योती पांडे, ॲड. आशिष ताम्हणे, एम. ए. सईद आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲड. आस्मा शेख यांनी केले.