प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल अशा खरेदी-विक्रीच्या
जमिनीसाठी मोजणी नकाशाची आवश्यकता नाही
छत्रपती संभाजीनगर – खरेदी-विक्री होणाऱ्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ जर प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी नसेल, तर त्या दस्ताला मोजणी नकाशा जोडण्याची आवश्यकता भासणार नाही. याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
या नव्या नियमानुसार, जर जमिनीच्या दस्तऐवजामध्ये मिळकतीची ओळख पटविण्यासाठी पुरेसे वर्णन नमूद केलेले असेल, तर मोजणी नकाशा जोडण्याची गरज नाही. या संदर्भात कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, यापूर्वी दस्तऐवज नोंदणीसाठी जी कागदपत्रे आवश्यक होती, तीच कागदपत्रे आजही लागू राहतील. कागदपत्रांच्या यादीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांचा मोजणी नकाशा मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचणार आहे. मात्र, दस्तऐवजामध्ये जमिनीची योग्य ओळख पटविण्यासाठी पुरेसे वर्णन असणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन व्हि. पी .भूमकर, सह जिल्हा निबंधक, वर्ग दोन, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे केले आहे.
