प्रहसनाने प्रेक्षकांना खळाळून हसवले!
छत्रपती संभाजीनगर, दि.२८ : असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या ३९ व्या सेंट्रल झोन युवा महोत्सवांतर्गत रुक्मिणी सभागृहात सादर झालेल्या प्रहसनांनी प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवले. विविध विद्यापीठांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांवरील व्यंगात्मक प्रहसनांद्वारे हशा आणि विचार यांचा समन्वय साधत प्रभावी प्रस्तुती दिली.
१.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी सादर केलेल्या प्रहसनात वेश्या व्यवसायातील महिलांचे जीवन, त्यांचा संघर्ष आणि समाजाची दुटप्पी भूमिका यावर टोकदार भाष्य करण्यात आले. “आमचा धंदा प्रामाणिकतेवर आधारित आहे; आम्ही भावनांचा व्यापार करत नाही,” या संवादातून राजकारणासह अनेक क्षेत्रांत भावनांची खरेदी-विक्री सुरू असल्याचा कडवा व्यंग दाखवण्यात आला.
२.देवी अहिल्या विश्वविद्यालाय, इंदोर (मध्यप्रदेश) यांच्या प्रहसनात दोन पत्रकार ‘कुत्र्यांच्या राज्यात’ पोहोचतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात, अशी कल्पना मांडली. कुत्र्यांच्या उत्तरांतून त्यांची निष्ठा, प्रेम आणि मानवतावादी मूल्ये उलगडली. याच्या माध्यमातून “मनुष्यत्व माणसांमध्ये नव्हे, प्राण्यांमध्ये जास्त आहे” हा संदेश प्रभावीपणे समोर आला.
३.पं. रविशंकर शुक्ला विद्यापीठ, रायपूर (छत्तीसगड) यांच्या सादरीकरणात रामलीला करणाऱ्या कलाकारांची सध्याची स्थिती दाखवण्यात आली. काही कलाकार पारंपरिक भूमिकांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करून केवळ पैशासाठी अभिनय करतात, हे वास्तव विनोदी शैलीत नाट्यमयरीत्या मांडले गेले.
४.राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर (मध्यप्रदेश) यांच्या प्रहसनात मोबाईलच्या मोहात अडकलेल्या समाजाचे वास्तव मांडण्यात आले. राजाच्या सोबतीला ‘मोबाईल’ हे प्रमुख पात्र दाखवून व्यंग साकारण्यात आले. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले असून नाती, भावना आणि वास्तव यांपासून दूर जात असल्याचा विचारप्रवर्तक संदेश यातून दिला. “माणसाने मोबाईल हातात ठेवावा; आयुष्य मोबाईलच्या हातात देऊ नये,” ही प्रभावी शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
या प्रहसनांनी हशा, कथानकाची चपळता, सामाजिक भाष्य आणि नेमक्या संवादांद्वारे रुक्मिणी सभागृहात स्मरणीय रंगत निर्माण केली. युवा कलावंतांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे हा कार्यक्रम युवा महोत्सवातील विशेष आकर्षण ठरला.
