प्रा. हरेराम त्रिपाठी यांना राज्यपालांची श्रद्धांजली
मुंबई, दि. २३ : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांच्या अपघाती निधनाबद्दल राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी व त्यांच्या पत्नीचे उत्तर प्रदेश येथील कुशीनगर जवळ अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. प्रा. हरेराम त्रिपाठी हे संस्कृतचे विद्वान, संशोधक व लोकप्रिय शिक्षक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निष्ठेने कार्य केले. त्यांच्या प्रयत्नामुळे साकार झालेल्या विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय हेडगेवार शैक्षणिक भवनाचे नुकतेच उद्घाटन झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात पायाभूत सुविधांचा विकास, चर्चासत्रांचे आयोजन तसेच संशोधन प्रकल्पांवर उल्लेखनीय काम झाले. त्यांच्या निधनामुळे संस्कृत भाषेसाठी निष्ठेने झटणारा एक संशोधक, अभ्यासक व उत्तम प्रशासक गमावला आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
