प्रा. डॉ. स्मिता अवचार : समाजशास्त्राच्या सेवाव्रतापासून ते जीवनगौरवापर्यंत
महाराष्ट्रासह भारतातील समाजशास्त्रीय परंपरेत काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की ज्यांचे कार्य केवळ विद्यापीठीय चौकटीत मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या वैचारिक जडणघडणीचा अविभाज्य भाग बनते. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम आहेत. समाजशास्त्र या विषयाला मानवी संवेदनशीलतेची, सामाजिक बांधिलकीची आणि शास्त्रीय काटेकोरतेची जोड देत त्यांनी जे दीर्घकालीन कार्य केले आहे, त्याची दखल घेत महाराष्ट्रातील मराठी समाजशास्त्र परिषद यांच्यातर्फे देण्यात येणारा २०२५-२६ चा जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. दि. १७-१८ फेब्रुवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, कला व वाणिज्य महाविद्यालय, सिन्नर, जि. नाशिक येथे आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेच्या ३५व्या राष्ट्रीय अधिवेशनात हा सन्मान मराठी समाजशास्त्र परिषेदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणसिंग साळोक आणि भारतीय समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीप्ती रंजन साहू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि महाराष्ट्रासह भारतातील समाजशास्त्र क्षेत्रात एक गौरवशाली क्षण नोंदवला गेला आहे.
हा पुरस्कार केवळ एका प्राध्यापिकेच्या प्रदीर्घ सेवेला दिलेली औपचारिक मान्यता नाही, तर समाजशास्त्र या विषयाच्या सामाजिक उपयोगितेला दिलेली दाद आहे. समाजातील दुर्बल, वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना संशोधनाच्या केंद्रस्थानी ठेवून समाजशास्त्राला ‘माणसांशी जोडलेला विषय’ बनवण्याचे कार्य प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांनी आयुष्यभर केले. त्यामुळेच जीवन गौरव पुरस्कार हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा शेवट नसून, त्यांच्या सेवाव्रताची सार्वजनिक कबुली आहे.
प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांचा शैक्षणिक प्रवास हा सातत्य, चिकाटी आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा सुंदर संगम आहे. एम.ए., एम.फिल., डी.एच.ई. आणि पीएच.डी. या शैक्षणिक टप्प्यांतून त्यांनी समाजशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, सिद्धांत आणि संशोधन पद्धती यांचे सखोल ज्ञान प्राप्त केले. मात्र, त्यांच्या शिक्षणाचा उद्देश केवळ पदव्या मिळवणे हा कधीच नव्हता. समाज समजून घेणे, समाजातील प्रश्न ओळखणे आणि त्या प्रश्नांवर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणे, हा त्यांच्या अभ्यासाचा खरा गाभा राहिला.
समाजशास्त्र हा विषय त्यांनी केवळ सैद्धांतिक पातळीवर न ठेवता तो समाजाशी संवाद साधणारा बनवला. सामाजिक बदल, विकास प्रक्रिया, कुटुंबसंस्था, लिंगभाव, स्त्री-पुरुष संबंध, वृद्धत्व, शहरीकरण आणि ग्रामीण वास्तव या सर्व विषयांकडे त्यांनी संवेदनशीलतेने आणि वस्तुनिष्ठतेने पाहिले. त्यामुळेच त्यांचा शैक्षणिक प्रवास हा ‘पुस्तकांतील समाज’ आणि ‘प्रत्यक्षातील समाज’ यांच्यातील दरी भरून काढणारा ठरतो.
त्यांचे दीर्घकालीन अध्यापन कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील समाजशास्त्र विभागाशी निगडित आहे. विद्यापीठीय प्राध्यापिका आणि विभागप्रमुख म्हणून त्यांनी पदव्युत्तर स्तरावर समाजशास्त्र विषयाचे अध्यापन केले. वर्गखोलीतील त्यांचे अध्यापन हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरते मर्यादित नव्हते, तर विद्यार्थ्यांमध्ये समाजाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी निर्माण करणारे होते. सामाजिक घटनांचे विश्लेषण, प्रत्यक्ष उदाहरणे, क्षेत्रकार्याचे अनुभव आणि संशोधनातील शिस्त या सर्वांचा समन्वय त्यांच्या अध्यापनात दिसून येतो.
समाजशास्त्र शिकवताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला, निरीक्षण करायला आणि निष्कर्ष काढायला शिकवले. ‘समाजशास्त्र म्हणजे केवळ उत्तरांचा संच नव्हे, तर प्रश्न विचारण्याची शिस्त आहे,’ ही भूमिका त्यांच्या अध्यापनातून सातत्याने व्यक्त होत राहिली. त्यामुळेच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ परीक्षाभिमुख तयारी नव्हे, तर संशोधनाभिमुख विचारसरणी विकसित झाली.
अध्यापनाबरोबरच संशोधन हे प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांच्या शैक्षणिक जीवनाचे मुख्य केंद्र राहिले. समाजशास्त्रीय संशोधन पद्धती, विकासाचे समाजशास्त्र, लिंगभाव आणि समाज तसेच वृद्धत्वाचे समाजशास्त्र ही त्यांची विशेष अभ्यासक्षेत्रे आहेत. या क्षेत्रांतील त्यांचे संशोधन केवळ सैद्धांतिक न राहता प्रत्यक्ष सामाजिक वास्तवाशी घट्ट जोडलेले आहे. कौटुंबिक बदल, शहरीकरण, औद्योगिकीकरण, महिलांचे सक्षमीकरण, वृद्धांचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार आणि दारूबंदी चळवळ यांसारख्या विषयांवर त्यांनी केलेले संशोधन समाजातील बदलत्या प्रक्रिया स्पष्ट करणारे ठरत आहे.
विकासाचे समाजशास्त्र या क्षेत्रात त्यांनी विकास प्रक्रियेचा मानवी पैलू अधोरेखित केला. विकास म्हणजे केवळ आर्थिक वाढ नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि मानवी सन्मान यांचा समतोल असावा, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. ग्रामीण आणि शहरी समाजातील विकासातील तफावत, स्वयं-सहायता गटांचे सामाजिक परिणाम आणि महिलांचे सक्षमीकरण यावरील त्यांच्या संशोधनातून विकासाच्या संकल्पनेला व्यापक अर्थ प्राप्त झाला आहे.
लिंगभाव आणि समाज या विषयावर त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ कायदेशीर तरतुदींमध्ये मर्यादित न राहता ती सामाजिक व्यवहारात कशी प्रकट होते, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. महिलांवरील हिंसाचार, कौटुंबिक नातेसंबंध, कामगार क्षेत्रातील महिलांची स्थिती आणि दारूबंदी चळवळीत महिलांची भूमिका अशा विषयांवरील त्यांच्या संशोधनातून लिंगभाव असमानतेची संरचनात्मक कारणे स्पष्ट झाली आहेत. त्यांच्या लेखनात स्त्री ही केवळ अभ्यासविषय न राहता सामाजिक परिवर्तनाची सक्रिय घटक म्हणून समोर आली आहे.
वृद्धत्वाचे समाजशास्त्र हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा आयाम आहे. बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे वृद्धांच्या जीवनावर होणारे परिणाम, वृद्धाश्रमांची वाढ, वृद्धांचे सामाजिक-मानसिक प्रश्न आणि कौटुंबिक आधाराचा अभाव या विषयांवरील त्यांच्या संशोधनाने वृद्धत्वाच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले. वृद्ध ही केवळ कल्याणकारी योजनांची लक्ष्यगट नसून सन्मानाने जगण्याचा हक्क असलेली व्यक्ती आहे, ही भूमिका त्यांच्या संशोधनातून ठळकपणे व्यक्त झाली आहे.
संशोधन मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. एम. ए., एम.फिल. आणि पीएच.डी., आणि पोस्ट-डॉक्टोरेट (पी.डी.एफ.) स्तरावर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. या संशोधन प्रबंधांचे विषय पाहिले, तर समाजातील विविध घटकांचे जीवनविश्व उलगडताना दिसते. दलित व मागासवर्गीय समाज, आदिवासी समुदाय, कामगार, महिला, वृद्ध, अपंग, विधीसंघार्षित बालके, पोलीस व्यवस्था, स्वयं-सहायता गट आणि विस्थापित लोकसंख्या इत्यादी. या संशोधनातून समाजातील संरचनात्मक विषमता, सामाजिक नियंत्रण आणि बदलत्या सामाजिक मूल्यांचे विश्लेषण झाले.
प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांचे पोस्ट-डॉक्टोरेट (पी.डी.एफ.) संशोधनासाठी डॉ. राजेंद्र बगाटे यांना अनमोल मार्गदर्शन लाभले आहे, तर पीएच.डी. पदवी संशोधनासाठी डॉ. ए.डी. साबळे, डॉ. डी.एस. कोरे, डॉ. स्नेहलता मानकर, डॉ. नारायण बोराडे, डॉ. सुनिता अंकुश (वाघमारे), डॉ. डी.डी. घोडगे, डॉ. डी.एल. तोरवणे, डॉ. अरुंधती पाटील, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. शिवकुमार सोळंके, डॉ. शोभा इंगळे, डॉ. राजेंद्र बगाटे, डॉ. आरती धनवे, डॉ. मंगलमुर्ती धोकटे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. रुपसी दास, डॉ. गणेश मोकासरे, डॉ. रेवणनाथ काळे, डॉ. अंबिका दत्ता, डॉ. वैशाली जाधव, सुजाता पाटील आणि सविता कोटूरी इत्यादी संशोधकांना अनमोल मार्गदर्शन लाभले आणि लाभत आहे. तसेच अनेक माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल. पदवीसाठी अनमोल मार्गदर्शन लाभले आणि लाभत आहे.
मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक सूचना दिल्या नाहीत, तर संशोधनातील नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीचे भान दिले. माहिती संकलन करताना प्रतिसादकर्त्यांचा सन्मान, निष्कर्ष मांडताना वस्तुनिष्ठता आणि निष्कर्षांचा समाजासाठी होणारा उपयोग या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले संशोधन केवळ विद्यापीठीय निकष पूर्ण करणारे न राहता समाजोपयोगी ठरत आहे.
पोस्ट-डॉक्टोरल (पी.डी.एफ.) संशोधन मार्गदर्शन हे प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (आय.सी.एस.एस.आर.), नवी दिल्ली अंतर्गत त्यांनी पोस्ट-डॉक्टोरल (पी.डी.एफ.) संशोधनासाठी डॉ. राजेंद्र बगाटे यांना “प्रॉब्लेम्स ऑफ एल्डरली लिविंग इन ओल्ड एज होम्स इन महाराष्ट्रा’ या वृद्धांशी संबंधित संशोधन विषयावर मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्रात समाजशास्त्र विषयातील पहिल्या पोस्ट-डॉक्टोरल संशोधनाची परंपरा घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांचे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्न, त्यांची सामाजिक-मानसिक अवस्था, कौटुंबिक नात्यांतील बदल, कौटुंबिक आधाराचा अभाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रश्न या विषयावर झालेल्या पोस्ट-डॉक्टोरल संशोधनातून समाजधोरणांसाठी उपयुक्त निष्कर्ष पुढे आले आहेत.
ग्रंथनिर्मिती आणि लेखन हे त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे महत्त्वाचे साधन राहिले आहे. समाजशास्त्रीय संज्ञा, स्वयं-सहायता गट आणि लिंगभाव समता यांसारख्या विषयांवरील त्यांची पुस्तके विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरली. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत त्यांनी लेखन केले असून, त्यामुळे स्थानिक सामाजिक प्रश्नांची मांडणी व्यापक शैक्षणिक वर्तुळात पोहोचली आहे. संशोधन नियतकालिके, संपादित ग्रंथ आणि परिषद कार्यवृत्तांमधील त्यांचे लेख समाजशास्त्रीय चर्चेला दिशा देणारे ठरले आहेत.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभागाने त्यांच्या कार्याला व्यापक परिमाण लाभले. वृद्धत्व, लिंगभाव असमानता, विश्रांतीकालीन जीवन आणि सामाजिक विकास अशा विषयांवरील शोधनिबंध त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केले. या अनुभवांचा लाभ त्यांच्या अध्यापन आणि संशोधनात झाला आणि भारतीय समाजातील प्रश्नांचे जागतिक समाजशास्त्रीय चौकटीत विश्लेषण शक्य झाले.
समाजशास्त्र हे केवळ अकादमिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते सामाजिक कृतीशी जोडलेले असावे, हा विश्वास त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. महिला संघटना, महिला सुरक्षा समित्या, जनशिक्षण संस्थान आणि ग्राहक चळवळीतील सहभागातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. संशोधनातून निष्पन्न झालेले निष्कर्ष समाजकार्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष समाजात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसतो.
विद्यापीठीय प्रशासन आणि शिक्षक संघटनांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक वर्ष त्या समाजशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख राहिल्या असून त्यांनी विद्यापीठांमध्ये अधिसभा सदस्यासह अनेक महत्वपूर्ण पदांवर काम केले आहे. या पदांवर असतांना त्यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यापैकी कुणालाही त्रास दिलेला नाही, तर प्रत्येकाच्या अडचणी समजून घेवून त्या सोडवल्या आहेत आणि आज पण सोडवत आहेत. शिक्षक संघटनेतील जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी शैक्षणिक लोकशाही, पारदर्शकता आणि सहकार्य या मूल्यांचा पुरस्कार केला. सहकारी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी त्या नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान राहिल्या आहेत.
प्रा. डॉ. स्मिता अवचार यांच्या कार्याचे सर्वात प्रभावी प्रतिबिंब म्हणजे गुरू-शिष्य परंपरा होय. गुरू म्हणून त्यांनी अधिकार गाजवण्याऐवजी विश्वास निर्माण केला. संशोधनातील अडचणी, क्षेत्रकार्याचे अनुभव आणि सैद्धांतिक संभ्रम या सर्व बाबींवर त्यांनी संयमाने मार्गदर्शन केले. त्यामुळेच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ संशोधक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्या जागरूक माणसे घडली आहेत.
या संदर्भात माझा म्हणजेच डॉ. राजेंद्र बगाटे यांचा वैयक्तिक अनुभव विशेष उल्लेखनीय ठरतो. एम.ए., नेट-जेआरएफ, एम.फिल., पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक्टोरेट (पी.डी.एफ.) संशोधन या सर्व शैक्षणिक टप्प्यांवर एकाच गुरूच्या मार्गदर्शनाखाली घडणे ही दुर्मीळ बाब आहे. या संपूर्ण प्रवासात प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांनी केवळ संशोधनविषयक मार्गदर्शन केले नाही, तर शैक्षणिक प्रामाणिकपणा, सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीची मूल्ये रुजवली आहेत. संशोधन म्हणजे केवळ पदवी मिळवणे नसून समाजासाठी काहीतरी देण्याची जबाबदारी आहे, ही शिकवण त्यांच्या मार्गदर्शनातून मिळाली आहे.
प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांना देण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराचे महत्त्व या सर्व पार्श्वभूमीवर अधिक खोलवर समजते. हा पुरस्कार म्हणजे प्रदीर्घ सेवेला दिलेला सन्मान असला, तरी तो समाजशास्त्र या विषयाच्या सामाजिक उपयोगितेची सार्वजनिक कबुली आहे. समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण, वृद्धांचे सन्मानजनक जीवन आणि विकासातील मानवी पैलू या सर्व विषयांना शास्त्रीय अधिष्ठान देण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्याचीच ही औपचारिक पावती आहे.
समारोप करताना असे म्हणावे लागेल की, प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांना प्रदान करण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हा त्यांच्या वैयक्तिक यशाचा क्षण असला, तरी तो महाराष्ट्रासह भारतातील समाजशास्त्र क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. समाजशास्त्राच्या माध्यमातून समाज अधिक समताधिष्ठित, संवेदनशील आणि न्याय्य व्हावा, या उद्देशाने त्यांनी जे कार्य केले, त्याची दखल या पुरस्कारातून घेतली गेली आहे. त्यांच्या ज्ञानाने, मार्गदर्शनाने आणि मूल्यांनी घडलेली पिढी हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. समाजशास्त्राच्या सेवाव्रताचा हा प्रवास दीर्घकाळ प्रेरणादायी ठरो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
-डॉ. राजेंद्र बगाटे
