अंबड-घनसावंगी तालुक्यांत आज पोलीस पाटील भरती परीक्षा
घनसावंगी/प्रतिनिधी/ अंबड उपविभागातील अंबड व घनसावंगी तालुक्यांमधील रिक्त असलेल्या १८३ पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा उद्या, रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी दोन्ही तालुक्यांतील एकूण १८६९ उमेदवार प्रविष्ट होणार असून, परीक्षेचे आयोजन जालना येथील सहा परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे.ही परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निःपक्षपाती आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष तयारी केली आहे. तहसीलदार अंबड विजय चव्हाण आणि घनसावंगी पूजा वंजारी घनसावंगी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा प्रक्रिया राबवली जाणार असून, उपविभागीय अधिकारी अंबड उमाकांत पारधी तसेच जिल्हाधिकारी जालना यांच्या थेट नियंत्रणाखाली ही परीक्षा होणार आहे.सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग: सर्व परीक्षा केंद्रांवर तसेच प्रत्येक हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून परीक्षेचे थेट वेबकास्टिंग होणार आहे.उमेदवारांची व्हिडिओग्राफी: प्रवेशावेळी आणि परीक्षा सुरू असताना प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र व्हिडिओग्राफी केली जाणार आहे.भरारी पथके: आकस्मिक तपासणीसाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.पोलीस बंदोबस्त: सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी प्रशासनाचे आवाहन
भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारेच होणार असल्याने कोणत्याही व्यक्तीच्या, दलालाच्या किंवा मध्यस्थाच्या आमिषाला बळी पडू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. कोणतीही अवैध मदत, नोकरी लावण्याचे आश्वासन इत्यादी प्रकार तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावेत, असेही सांगण्यात आले आहे.