पिशोर कोळंबी रस्त्यावरील पुलाचे काम त्वरित चालू करा आमदार संजना जाधव
कन्नड/ प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील पिशोर कोळंबी रस्त्यांवरील पुलांचे काम तातडीने सुरू करून पुर्ण करा अशा सूचना आमदार संजनाताई जाधव यांनी पाहाणी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पिशोर ते कोळंबी रस्त्यावर गेल्या दीड वर्षांपासून वादात असलेला आणि रखडलेल्या अवस्थेत असलेला पूल हा या परिसरातील नागरिकांसाठी आणि विशेषता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हंगामी पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता या पुलाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्यास परिसरातील अनेक गावांचा मुख्य संपर्क तुटण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि शेतीच्या व्यवहारांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून आमदार संजनाताई जाधव स्वतः प्रत्यक्ष स्थळी जाऊन पुलाची सविस्तर पाहणी केली. परिस्थितीचे
गांभीर्य ओळखून आमदार संजनाताई जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम (पच्चिम) चे कार्यकारी अभियंता एस.जी. केंद्रे यांना पुलाचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार विघाचरण कडवकर सार्वजनिक बांधकाम
उपविभागाचे उपअभियंता प्रशांत येरणे, पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, शाखा अभियंता एस.डी. शिंदे पुंडलिक डहाके, आदित्य गर्जे, सर्व संबंधित अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.