पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाबाबत” प्रशिक्षण कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांच्याकडून “पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत” सखोल प्रशिक्षण कार्यशाळा २५ ते २७ मार्च २०२५ रोजी कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजीत करण्यात आली आहे.
“पिंजरा मत्स्यसंवर्धन” तंत्रज्ञान किफायतशीर होण्यासाठी पिंजरे स्थापित केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापुर्वी पुर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन महत्वाचे आहे.
कार्यशाळेमध्ये शास्रोक्त पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाचे बारकावे सखोल पद्धतीने समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ञ अधिकारी व अनुभवी पिंजरासंवर्धक यांचेमार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, व परभणी या ८ जिल्ह्यांमध्ये केज प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा अंतर्गत योजनेतील सर्व पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
