नाचनवेल पिशोर चिंचोली परिसरात युरिया खताचा तुटवडा शेतकरी संकटात
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नाचनवेल पिशोर चिंचोलीं परिसरात यावर्षी अवकाळीने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाची लगबग चालू झाली आहे. पेरणीसाठी जमवाजमव चालू असतानाच बाजारात खरीप हंगामातील बियाणांचे दर वाढले असून, रासायनिक खताची कमतरता दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.मृग नक्षत्राची बरसात झाली असताना आजच ही परिस्थिती जाणवत असल्याने कृत्रिम टंचाईची भीती शेतकऱ्यांना आहे. खरीप हंगामात मका, कापूस, बाजरीची पेर मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र गेल्या तीन वर्षांपासून बाजारभाव नसल्याने व शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र हे नाममात्र ठरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. मृग नक्षत्र पूर्वीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता पेरणीची घाई झाली असताना बाजारात मुबलक खते उपलब्ध नाही.
इतर खते घेतल्याशिवाय युरिया मिळत नसल्याचे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बियाणे व खताच्या किमती वाढल्या असून, रासायनिक खताची वाणवा दिसून येत आहे. खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा असून, जिरायत कोरडवाहू शेतकऱ्याची भिस्त खरिपावरच अवलंबून असते. खताच्या व बियाणांच्या किमती वाढल्याने व्यापाऱ्याकडून खते घेण्याची लिंकिंग पद्धत शेतकऱ्यांना त्रासदायक ठरली आहे. खत घेतले तरच बियाणे व कृत्रिम टंचाई प्रतिवर्षी येणारा अनुभव असून, यावर कृषी विभाग व पंचायत समिती यांनी मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने या अवकाळी पावसावर पेरणी करण्यास शेतकरी धजावत नाही. खते व बी-बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.