छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती चौंडी येथे साजरी होत आहे. अहिल्यामातेच्या जन्मस्थळी होत असेलेल्या जयंतीसोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना आमंत्रित करण्यात आल्याचे आ. गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या जयंतीसोहळ्याला आमंत्रित करणार नसल्याचे आ. पडळकर यांनी जाहीर केले आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा भव्य होत असणे हे प्रत्येक अहिल्याभक्तांसाठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे. मात्र अशा सोहळ्यात राजकीय अभिनिवेश, राजकीय वैर मनात धरून राज्याचे संविधानिक पद सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न बोलविणे संयुक्तीक वाटत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशव्यापी आणि सर्वसमावेशक होते. त्यांना कोणत्याही राजकीय अथवा जातीय तराजूत तोलणे योग्य नाही. त्यांनी केलेले कार्य केवळ धनगर समाजासाठी नव्हते तर अखंड हिंदुस्थानासाठी होते. त्यांनी बांधलेले बारव, पाण्याच्या विहिरी सर्वांची तहान भागवायच्या. देशात अनेक ठिकाणी हजारो वडाची झाडे अहिल्यामातेने लावून वाटसरूला सावली मिळेल याची दक्षता घेतली. हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अशा या राजमाता, लोकमातेला राजकीय पक्ष, स्थानिक राजकारणाच्या अतिशय घाणेरड्या प्रकारात न ओढता जयंती उत्सव निर्विवाद पार पडावा अशी पुण्यश्लोक सेनेची भूमिका आहे. अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातूनही अनेक धनगर समाजाचे आमदार, मंत्री. लोकप्रतिनिधी केले आहेत. जयंती मोहत्सवासारख्या ठिकाणी आ. पडळकर यांनी राजकारण करणे योग्य नाही. त्यांची अजित पवार यांच्या सोबत असलेली राजकीय दुश्मनी त्यांनी राजकीय मैदानात वापरावी ती पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंती उत्सवात आणून राजकीय स्वार्थ साधू नये असे पुण्यश्चीक सेना आव्हान करत आहे.
