पत्रा चाळ घोटाळ्यावर राऊतांनी पत्रकार परिषद घ्यावी
भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे आव्हान
राऊत, उबाठा यांनी ‘ माझा लादेन, माझा पाकिस्तान’ अभियान राबवावे
जनाब संजय राऊत यांनी ‘माझा देश ,माझे कुंकू’ हे अभियान नव्हे तर ‘माझा लादेन माझा पाकिस्तान’ हे अभियान राबवावे असा खोचक सल्ला भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी दिला. सचिन वाझेची पाठराखण करताना ‘वाझे काय लादेन आहे का’ असा पोरकट सवाल उबाठानी केला होता याची आठवण करून देत, तसेच उबाठा, जनाब राऊत यांच्यामार्फत सतत पाकिस्तानचा होत असलेला उदो उदो पाहता ‘माझा लादेन माझा पाकिस्तान’ हेच अभियान त्यांच्यासाठी योग्य आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ उपस्थित होत्या.
श्री.राऊत यांनी केलेल्या ‘सक्षम देवेंद्र फडणवीस’ या खोचक टिप्पणीला सणसणीत उत्तर देत श्री. बन म्हणाले की महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटून राज्याला प्रगतीपथावर नेणारे सक्षम नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. याउलट उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अत्यंत अकार्यक्षम होते. अडीच वर्षात अडीच दिवसही मंत्रालयात न येणा-या उबाठांची तुलना देवेंद्रजी यांच्याशी होऊच शकत नाही. जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत म्हणूनच तीन वेळा मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी विराजमान झाले. देवेंद्रजींच्या दहा वर्षांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं असेही ते म्हणाले.
पत्राचाळ घोटाळ्यावरून श्री. राऊत यांना लक्ष्य करत घोटाळ्याचं सत्य जनतेसमोर आणण्यासाठी राऊत यांनी पत्रकार परिषद घ्यावी त्याचा सर्व खर्च वैयक्तिक खात्यातून करेन असे आव्हान श्री. बन यांनी दिले. पत्राचाळ घोटाळ्यामुळे मराठी माणूस बेघर झाला. घोटाळ्याप्रकरणी श्री. राऊत यांनी तुरुंगाची हवा खाल्ली आणि अशा घोटाळेबाजाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवण्याचा पोरकटपणा करू नये असे फटकारले.
संजय राऊत यांनी आता नेपाळ आणि आधी श्रीलंका आणि बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटना भारताशी जोडून देशविरोधी वक्तव्य केली, त्यांची अशी भाषा म्हणजे देशद्रोह आहे. देशात आणि महाराष्ट्रात अराजक माजेल अशा वावड्या उठवण्याचा निलाजरेपणा राऊत करत आहेत. राऊतांनी कितीही अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला तरी अपयशी ठरणार आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच चालतो असे ठणकावून सांगितले. संजय राऊत यांची वैचारिक सुंथा झाली असून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा खून केला, औरंगजेबाचा उदो-उदो केला या शब्दांत श्री. बन यांनी टीकेची झोड उठवली.
लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारने सन्मान निधी दिला. त्यांना राऊत यांनी ‘पगारी’ म्हणत हिणवणे म्हणजे महिलांचा अपमान आहे अशी टीका श्री. बन यांनी केली. आमच्या लाडक्या बहिणी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राऊतांना रोखठोक उत्तर देतील असेही त्यांनी नमूद केले. सामना मध्ये पगारी नोकर असणा-यांनी ‘पगारी’ म्हणत महिलांचा अपमान करण्याची नसती उठाठेव त्वरित थांबवावी असा इशाराही त्यांनी दिला.
