Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादपत्नी पीडित पुरुषांनाही संरक्षण मिळावे!

पत्नी पीडित पुरुषांनाही संरक्षण मिळावे!

पत्नी पीडित पुरुषांनाही संरक्षण मिळावे!
        औरंगाबादेतील वाळूंज भागातील पत्नीपीडित पुरुषांच्या आश्रमात  काही पत्नीपीडित पुरुषांनी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळपूजन करून पिंपळपौर्णिमा साजरी केली. हे पुरुष दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी करतात. आमच्या बायकांनी आम्हाला इतका त्रास दिला आहे की आम्ही त्यांच्यासोबत सात जन्मच काय  सात सेकंदही संसार करू शकत नाही म्हणूनच आम्हाला अशा प्रकारच्या बायका देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव अशी प्रार्थना ते यम आणि मुंजाला करतात.  हा प्रकार काहीसा विचित्र वाटत असला तरी खरा आहे.  पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरतात यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही याला कारण आहे आपली पुरुष प्रधान संस्कृती. पुरुषच महिलांवर अत्याचार करतो, त्यांचा मानसिक छळ करतो हेच आजवर आपण पाहत आलो आहोत पण आता काळ बदलला आहे. पुरुषही महिलांच्या अत्याचाराला बळी पडत आहे. आज कितीतरी पुरुष महिलांचा मानसिक अत्याचार सहन करत आहेत. पत्नी आपल्यावर अत्याचार करते आपला मानसिक छळ करते हे जर समाजात माहीत झाले तर आपलीच नाचक्की होईल या भीतीने अनेक पुरुष तो अत्याचार मुकाट्याने सहन करतात. ज्यांना हा अत्याचार सहन होत नाही ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.
 काही महिन्यांपूर्वी बंगळुरू मध्ये एका कंपनीत अभियंता असलेल्या ३४ वर्षीय अतुल सुभाष या तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्यावरील आपबिती ९० मिनिटांचा व्हिडिओ काढून तसेच ४० पाणी सुसाईड नोट लिहून सांगितली. या तरुणाला त्याच्या पत्नी आणि सासरच्यांनी हुंडाबळीच्या चुकीच्या आरोपाखाली तरुंगामध्ये  पाठवले होते. काहीही चूक नसताना या तरुणाला तुरुंगात जावे लागले. न्यायालयात तो स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करू शकला नाही.  समाजात त्याची बदनामी झाली त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. अर्थात अशी आत्महत्या करणारा अतुल सुभाष हा पहिला तरुण नाही याआधीही अनेक तरुणांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. आताही काही  दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील उरुळी येथे एका तरुणाने याच कारणाने आत्महत्या केल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचनात आली. महिलेचा पती व त्याच्या कुटुंबियांकडून होणारा छळ रोखण्यासाठी ४९८ ( अ ) हा कायदा करण्यात आला. महिलांना संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या  या कायद्याचा अलीकडे मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होऊ लागला आहे. या माध्यमातून पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध वैयक्तिक सुड उगवला जात आहे. महिलांनी त्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याचा अशाप्रकारे दुरुपयोग करू नये अशी टिप्पणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील केली आहे. तरीही या कायद्याचा दुरुपयोग कमी होत नाही.  पत्नीने पती विरुद्ध तक्रार दिली तर त्याची तातडीने  दखल घेतली जाते.  पत्नीवर अन्याय करणाऱ्या पतीला तात्काळ अटक केली जाते पण पतीला पत्नी विरुद्ध कारवाई करायची असेल, तर आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार अधिनियमना सारखा कायदा उपलब्ध नाही. सध्या असलेला कौटुंबिक अधिनियम संरक्षण कायदा पुरुषांना संरक्षण देत नाही. महिलांप्रमाणेच  पत्नी पीडित पुरुषांनाही संरक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी सरकारने कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कायद्यात दुरुस्ती करून  पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण द्यावे.
-श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments