जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी
जालना : जालना जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे त्यामुळे नदीच्या काठावरील अनेक गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील काही गावात देखील नदीचे पाणी घुसून नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. काहींच्या घरात पाणी आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आज जालना जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांचा दौरा केला. यावेळी श्रीमती मुंडे यांनी परतूर तालूक्यातील गोळेगाव, घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा, कुंभार पिंपळगाव, मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि अंबड तालुक्यातील सुखापूरी, शहापूर या गावांना भेट देऊन येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी श्रीमती मुंढे यांनी नागरिकांशी संवाद साधुन, त्यांना तात्काळ मदत करणार असल्याचे आश्वासित केले. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, परंतू शासनामार्फत पुरग्रस्त भागातील बाधीत नागरिक आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासन नागरिकाच्या पाठीशी असून, कोणीही काळजी करू नये. बाधित नागरिकांना शासन शक्य ती मदत करणार आहे. परतूर तालुक्यातील गोळेगावचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच या पुरामुळे अनेक नागरिक बेघर झाले असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यात येणार आहे. ज्या भागात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्या भागात अतिवृष्टी घोषित करण्याचा नियम आहे. परंतु जिल्ह्यात ज्याठिकाणी 65 मिमी पेक्षा देखील कमी पाऊस झाला असेल पण त्या ठिकाणी जास्त नुकसान झाले असल्यास त्याचेही पंचनामे करण्याच्या तसेच जिल्ह्यातील पर्जन्यमापकाची तपासणी करण्याच्या सूचना श्रीमती पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या.
यावेळी परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिनु, परतूरचे उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसिलदार प्रतिभा गोरे, घनसावंगीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार पूजा वंजारी, तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह नांदूर हवेली येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.
