प्रति, माननीय संपादकजी,
विषय:- नागपूरमध्ये ओसीडब्ल्यूच्या वाढीव पाणी बिलाचा ग्राहकांमध्ये आक्रोश.
जेव्हापासून पाण्याचे सुत्र ओसीडब्ल्यू कंपनीकडे आली तेव्हापासून बिलांच्या बाबतीत ग्राहकांचे हाल बेहाल होतांना दिसत आहे.राज्यातील अनेक महानगरपालिकेने बरेचशे व्यवहार खाजगी कंपन्यांकडे सुपुर्द केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे व यामुळे ग्राहकांचा मनस्ताप वाढत आहे. त्याचे उदाहरण नागपूर महानगरपालिकेमध्ये स्पष्ट दिसून येते. नागपूर महापालिकेतील पाण्याचा व्यवहार ओसीडब्ल्यू या प्रायव्हेट कंपनीकडे गेला तेव्हा पासून नागपूर शहरातील पाणी ग्राहक अत्यंत त्रस्त व चिंतेत आहेत.सरकारने २४ /७ पाण्याची योजना अंमलात आणली.परंतु २४ तास पाणी नागपूर शहरात कुठेही दिसत नाही.परंतू ओसीडब्ल्यू मात्र २४ तास पाण्याचे बिल उकळताना दिसते आणि ही बाब वाढीव बिलांवरून उघड दिसून येते.नागपूर शहरात तब्बल २५ हजार पेक्षा जास्त ग्राहकांना वाढीव पाण्याचा फटका बसल्याचे सांगितले जाते.तरीही ओसीडब्ल्यू गप्प बसल्याचे दिसून येते.यावरून स्पष्ट होते की, ओसीडब्ल्यू बिलांच्या बाबतीत ग्राहकांचा छळ करीत आहे.वाढती महागाई आणि त्यात वाढीव पाण्याच्या बिलाची भर ही तर महापालिकेची व ओसीडब्ल्यूची जाहीर लूटच म्हणावी लागेल.नोव्हेंबर महिन्यात महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी बैठक घेऊन ओसीडब्ल्यूला वाढीव बिलांबाबत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते.अन्यथा दरमहा ३.५ कोटी रूपयांचा दंड आकारला जाईल,असा इशाराही देण्यात आला होता.तरीही सुधारणा न झाल्याने डिसेंबर व जानेवारी महिन्यात ओसीडब्ल्यूवर एकूण ७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.तरीही ओसीडब्ल्यूमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाल्याचे दिसत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुर्वी महिन्याला ४०० ते ५०० रूपयांपर्यत बिल यायचे परंतु आता ओसीडब्ल्यूने बिलांच्या माध्यमातून ग्राहकांची लुट सुरू केल्याचा सपाटा लावला की काय असे दिसून येते.कारण ४०० ते ५०० रूपयांपर्यत येणारे बिल अचानक ५००० ते ९००० पेक्षा जास्त यायला सुरुवात झाल्याचे दिसून येते.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचा वापर वाढलेला नसतांनाही अचानक वाढीव बिले येत आहे.त्यामुळे ओसीडब्ल्यूने वाढीव बिलांच्या बाबतीत ताबडतोब कारवाई करून बिले कमी करण्यात यावे अन्यथा सरकारने ओसीडब्ल्यूला बरखास्त करून पाणी बिलांची संपूर्ण सुत्रे महानगरपालिकेच्या सुपुर्द करावी. त्याचप्रमाणे धक्कादायक बाब म्हणजे नागपूर शहरातील ९ झोनमधील सुमारे ५० वस्त्यांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.यामुळे सुमारे ४ लाख घरांमधील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. शहरातील पाणीपुरवठ्याच्या संदर्भात महापौर नीता ठाकरे यांनी १८ फेब्रुवारीला घेतलेल्या आढावा बैठकीत हे धक्कादायक वास्तव कळल्यानंतर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.यावरून स्पष्ट होते की, ओसीडब्ल्यू फक्त बिल वसूलण्याचे काम करीत आहेत. दुषित पाणी किंवा वाढीव बिलांच्या बाबतीत किंवा ग्राहकांच्या सुविधांच्या बाबतीत मौन असल्याचे दिसून येते.या संपूर्ण बाबींकडे ओसीडब्ल्यूने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे अन्यथा सरकारने ओसीडब्ल्यूवर कठोर कारवाई करावी.
-रमेश कृष्णराव लांजेवार
