पांढरी काठी : दृष्टिहीनांच्या आत्मविश्वासाचा प्रकाशमार्ग
जगात डोळे हे ज्ञानाचे, अनुभूतीचे आणि ओळखीसाठीचे सर्वात सामर्थ्यवान माध्यम मानले जाते. परंतु या डोळ्यांशिवायही अनेक व्यक्ती जग पाहतात ते मनाच्या डोळ्यांनी, संवेदनांच्या माध्यमातून, अनुभवाच्या प्रकाशातून. या अशा दृष्टिहीन व्यक्तींच्या स्वावलंबनाचे, सन्मानाचे आणि सामाजिक समानतेच्या अधिकाराचे प्रतीक म्हणजे पांढरी काठी (White Cane) होय. म्हणूनच दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पांढरी काठी दिन’ (World White Cane Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ दृष्टिहीनांच्या सन्मानाचा नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या स्वातंत्र्यपूर्ण जीवनाचा आदर करावा, याची आठवण करून देणारा आहे.
पांढऱ्या काठीचा इतिहास विसाव्या शतकाच्या आरंभीचा आहे. १९२१ मध्ये, इंग्लंडमधील ब्रिस्टॉल शहरातील छायाचित्रकार जेम्स बिग्स यांनी अपघातामुळे दृष्टी गमावली आणि रस्त्यावर सुरक्षितपणे चालण्यासाठी आपल्या चालण्याच्या काठीला पांढरे रंग लावले, ज्यामुळे ती वाहनचालकांना दिसू शकली. १९३१ मध्ये, फ्रान्समधील गिल्ली द’हर्बेमाँट यांनी पांढऱ्या काठीचा वापर दृष्टिहीनांसाठी सुरू केला. १९३१ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या एका समारंभात त्यांनी दोन पांढऱ्या काठी दृष्टिहीनांना दिल्या, ज्यात एक अंध सैनिक आणि एक अंध नागरीक होते. यानंतर ५,००० पांढऱ्या काठी फ्रान्समधील अंध सैनिक आणि नागरिकांना वितरित करण्यात आल्या. या घटनांमुळे पांढरी काठी दृष्टिहीनांसाठी एक महत्त्वपूर्ण चिन्ह बनली, ज्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यात मदत झाली. या काठीचा रंग पांढरा ठरविण्यामागे एक समाजशास्त्रीय विचार होता तो म्हणजे पांढरा रंग म्हणजे प्रकाश, शांती, सन्मान आणि दृष्टीचे प्रतीक होय. हा रंग इतर वाहनचालकांना किंवा नागरिकांना दृष्टिहीन व्यक्ती असल्याची ओळख देतो. १९६४ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी अधिकृतरीत्या १५ ऑक्टोबर हा ‘White Cane Safety Day’ म्हणून जाहीर केला. पुढे तो दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर World White Cane Day म्हणून साजरा होऊ लागला. आज या दिवशी जगभरातील संस्था, सरकारे आणि स्वयंसेवी संघटना दृष्टिहीनांच्या स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करतात.
पांढरी काठी ही केवळ चालण्याचे साधन नाही, ती स्वाभिमानाचे प्रतीक आहे. दृष्टिहीन व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव करून देणारी ही काठी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. काठीच्या साहाय्याने ते रस्त्यांवर सुरक्षितपणे चालू शकतात, अडथळे ओळखू शकतात, दिशांचा अंदाज घेऊ शकतात. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले, तर पांढरी काठी ही ‘स्वावलंबनाचे’ आणि ‘समानतेचे’ प्रतीक आहे. दृष्टिहीन व्यक्तीला मदतीवर अवलंबून राहावे लागत नाही, तर तो स्वतःच्या सामर्थ्याने समाजात मुक्तपणे वावरतो. हीच खरी ‘दृष्टी’ आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची, स्वातंत्र्याची आणि मानवी प्रतिष्ठेची.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगभरात सुमारे २८५ दशलक्ष लोक काही ना काही प्रकारच्या दृक्दोषाने ग्रस्त आहेत, त्यापैकी अनेक लोक पूर्णतः दृष्टिहीन आहेत. भारतातही दृक्दोषाचे प्रमाण चिंताजनक असून, अनेक लाख लोक विविध प्रकारच्या दृष्टिदोषाने प्रभावित आहेत. या परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था नेत्रदान, मोफत शस्त्रक्रिया, शिक्षण व रोजगार यासारख्या उपक्रमांद्वारे उपाययोजना करत आहेत. ग्रामीण भारतात अंधत्वाचे प्रमाण अधिक आहे, कारण आरोग्य सुविधा, जागरूकता आणि नेत्रोपचार या क्षेत्रांमध्ये अजूनही मोठी दरी आहे. राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रम (NPCB) अंतर्गत भारत सरकारने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. नेत्रदानाचे अभियान, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, दृष्टिहीनांसाठी शिक्षण व रोजगारसंधी यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. परंतु समाजाच्या मानसिकतेत बदल घडविणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
आजचा काळ माहिती आणि तंत्रज्ञानाचा आहे, आणि या क्षेत्रात दृष्टिहीनांसाठी संधीचे नवे दरवाजे उघडले आहेत. ब्रेल लिपी, स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर, टॉकिंग बुक्स, ऑडिओ-लायब्ररीज, अॅप-बेस्ड नेव्हिगेशन सिस्टम्स यामुळे दृष्टिहीन व्यक्ती आता शिक्षण, व्यवसाय, प्रशासन, संगणकशास्त्र, संगीत, कला, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांत पुढे जात आहेत. भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ व्हिज्युअल डिसॅबिलिटीज (NIEPVD), देहरादून हे संस्थान दृष्टिहीनांसाठी प्रशिक्षण, संशोधन व मार्गदर्शन पुरविते. महाराष्ट्रात हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड, नाशिक ब्लाइंड स्कूल, पुण्यातील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अशा संस्था दृष्टिहीनांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक समावेशनासाठी कार्यरत आहेत.
‘पांढरी काठी’ ही अनेक देशांत कायद्याने मान्यता प्राप्त आहे. भारतात Rights of Persons with Disabilities Act, 2016 अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींना शिक्षण, रोजगार, वाहतूक, सार्वजनिक सुविधा आणि मतदानाचा समान अधिकार दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी ब्रेल संकेत, साउंड सिग्नल्स, स्पर्शवाचक नकाशे, आणि सुरक्षित पादचारी मार्ग या सुविधा पुरविणे ही सरकारची जबाबदारी ठरविण्यात आली आहे. पांढरी काठी वापरणाऱ्या व्यक्तींचा सन्मान राखणे हे केवळ कायदेशीर नव्हे, तर नैतिक कर्तव्य आहे. पादचारी किंवा वाहनचालकांनी रस्त्यावर पांढरी काठी पाहिली, तर त्यांनी थांबून त्या व्यक्तीला सुरक्षित मार्ग द्यावा, हा ‘White Cane Safety’ चा मूलभूत नियम आहे.
समाजातील अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह हे दृष्टिहीनांच्या प्रगतीसमोरील सर्वात मोठे अडथळे आहेत. ‘अंधत्व म्हणजे अपंगत्व नव्हे’, हे जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. दृष्टिहीन व्यक्ती आपल्या संवेदना, बुध्दी आणि प्रतिभेच्या जोरावर समाजाचे महत्त्वाचे घटक ठरू शकतात, हे अनेक उदाहरणांनी सिद्ध केले आहे. जगप्रसिद्ध पियानिस्ट रे चार्ल्स, गायिका स्टीव्ही वंडर, भारतातील डॉ. बेनजामिन दोरिसवामी किंवा दीपक महालांकर यांसारख्या व्यक्तींनी अंधत्वावर मात करून जीवनाचे नवे आदर्श निर्माण केले. हे सर्व दाखवून देतात की काठीचा रंग पांढरा असला तरी त्या मागचा आत्मविश्वास मात्र तेजस्वी आहे.
जागतिक पांढरी काठी दिन (World White Cane Day) हा केवळ स्मरणदिन नाही; तो एक जागरूकता चळवळ आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि शासन विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करतात. जसे की दृष्टिहीनांसाठी वॉकाथॉन, पांढऱ्या काठीच्या रॅली, सार्वजनिक परिसंवाद, कार्यशाळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम. याचा हेतू समाजाला सांगणे हा आहे की दृष्टिहीन व्यक्ती दया किंवा सहानुभूतीच्या नाही, तर सन्मानाच्या पात्र आहेत.
शेवटी, पांढरी काठी ही अंधत्वाचे प्रतीक नाही, तर मानवी दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. ती अंधारातही आशेचा दिवा प्रज्वलित करते, निर्बंधांना आव्हान देते आणि प्रत्येक दृष्टिहीन व्यक्तीला स्वतःच्या सामर्थ्यावर चालण्याची प्रेरणा देते.जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक मनात जर आपण पांढऱ्या काठीला सन्मानाने वाव दिला, तर ते समाज म्हणून आपल्या प्रगल्भतेचे द्योतक ठरेल. जागतिक पांढरी काठी दिन हा आपल्याला शिकवतो की दृष्टी फक्त डोळ्यांत नसते; ती मनात, आत्म्यात आणि माणुसकीत असते. म्हणूनच या १५ ऑक्टोबरला, पांढऱ्या काठीचा सन्मान करा, दृष्टिहीनांच्या हक्कांचा आदर करा आणि समाजात ‘दृष्टी’ म्हणजेच ‘संवेदना’ हा खरा प्रकाश आहे, ही जाणीव पसरवा.
-डॉ. राजेंद्र बगाटे
