पैठण एमआयडीसी परिसरातील इनकोर फार्मा औषध कंपनीला लागली आग
पिपंळवाडी/ प्रतिनिधि/पैठण एमआयडीसी परिसरातील इनकोर फार्मा औषध कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर शनिवार रोजी दुपारी वेल्डिंग करण्याचे काम चालू असताना आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तब्बल दोन तासानंतर अडकलेल्या बेशुद्ध कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पैठण एमआयडीसीतील इनकोर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट क्रमांक ५ या ठिकाणी औषध कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे सकाळच्या शिफ्ट मधील कामगार काम करीत होते. यावेळी दुपारी तीनच्या दरम्यान कंपनीच्या वरच्या मजल्यावर वेल्डिंग काम सुरू होते. यावेळी अचानक आग लागून धूर येऊ लागला. या घटनेमुळे कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. कंपनी व्यवस्थापन व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिला कामगार व इतर कामगारांना सुखरूप बाहेर काढले.परंतु वरच्या मजल्यावर काम करीत असलेला रामनाथ बडसल या कामगाराचा शोध घेतला. परंतु हा कामगार आढळून आला नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. अडकलेल्या कामगाराचा शोध सुरू केला. घटनेची माहिती मिळताच आमदार भुमरे यांनी कंपनीच्या विविध विभागातील कामगारां चौकशी करून विचारपूस केली. तब्बल दोन तासांनंतर अंधारात अडकलेल्या बेशुद्ध झालेल्या कामगाराला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.