पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वपूर्ण बैठक संपन्न
रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडाल तर कारवाईला सामोरे जाल.- सपोनि ईश्वर जगदाळे
पैठण/ पैठण एम.आय.डी.सी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दि.(२०) गुरुवार रोजी पोलिस ठाणे अंतर्गत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीतील विविध राष्ट्रीयकृत बँकाचे मॅनेजर,पतसंस्था चालक त्यांचे मॅनेजर तसेच या परिसरातील सोने चांदीचा व्यापार करणाऱ्या दुकानदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती.
या बैठकीत बँका व त्यांचे एटीएम तसेच सोन्या चांदीचे दुकानाच्या सुरक्षा संदर्भात त्यांच्या व्यवस्थापकांनी
केलेली सुरक्षा व्यवस्था,सायरन याची माहिती घेत त्यांना या ठिकाणी उच्च दर्जाची सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, आणि बँका पतसंस्था तसेच सराफा दुकानाच्या सुरक्षा करिता त्यांच्या आसपास २४ तास शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याविषयी सूचना करण्यात आल्या. यासोबतच यावेळी पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार तसेच विविध गावचे पोलीस पाटलांची संयुकरित्या बैठक घेऊन गाव,वस्तीमधे दरोडा,रॉबरी,घरफोडी व चोरी आणि इतर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या अनुषंगाने सतर्कता बाळगावी.तसेच जर कोणालाही आपले गाव, वस्तीच्या परिसरात कोणी अनोळखी इसम आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला देण्यात यावी.गाव,वस्ती येथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी आपले मौल्यवान सोन्या चांदीचे दागदागिने व रोख रक्कम घरात न ठेवता बँक लॉकर मध्ये ठेवण्याबाबत सूचना देऊन पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांना सुरक्षित वाटावे यासाठी पोलिसांची गावागावात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई करण्यात येणार आहे. असे पैठण एम.आय.डी.सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी यावेळी सांगितले.