मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरीब रुग्णांसाठी वरदान
राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना महागड्या व जीवनावश्यक उपचारासाठी आर्थिक सहाय्य देणे जसे की कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण इत्यादीसाठी वैद्यकिय मदत पुरविणे. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आवश्यक वैद्यकिय उपकरणे, औषधे किंवा सुविधा निर्माण कर ण्यासाठी सहाय्य कर णे. वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालयांमधील सेवा एकत्रित करुन नागरिकांना सुलभ सेवा देण्याचा उद्देश आहे. गरीब, वंचित, आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांनाही उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करुन आरोग्य सेवा उपलब्धतेत समता आणणे आहे. धर्मादाय रुग्णालयांनी त्याची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी अथवा ट्रस्टच्या माध्यमातून अधिकाधिक गरीब रुग्णांवर मोफत किंवा सवलतीने उपचार करावेत यासाठी त्यांच्याशी समन्वय ठेवणे. त्वरीत निर्णयप्रक्रिया व पारदर्शकतेअंर्तगत रुग्णांच्या अर्जावर त्वरीत निर्णय घेणे व निधी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे अशी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची वैशिष्टे आहेत.
महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी या निधीतून सहाय्यता देण्यात येते. आरोग्यासाठी शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी महत्वाचा घटक आहे. राज्यातील शेकडो गरीब व गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल 14 हजार 651 रुग्णांना गेल्या सहा महिन्यात 128,6,68000/- मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मंजूर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीचा लाभ मिळण्यासाठी जालना जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून वैद्यकिय अधिकारी डॉ.सोपान विक्रम चव्हाण (9970336111) यांची नेमणूक केलेली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचाराच्या लाभासाठी जिल्ह्याच्या समन्वयकास फोन करुन रुग्णाला नामतालिकेवरील रुग्णालयात ॲडमिट करावे लागते. जिल्ह्यातील चॅरिटी हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडबाबत माहिती चॅरिटी इन्सपेक्टर यांच्या कार्यालयातून घेवून त्यानूसार चॅरिटी रुग्णास चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यात ॲडमिट करावे लागते. तर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत 0 ते 18 वर्षे वयापर्यंतच्या रुग्णांना मोफत उपचार केले जातात. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकिय अर्थसहाय्य वितरीत करणे या दोन्ही प्रक्रिया संपुर्णत: नि:शुल्क आहेत. उपचार पुर्ण झालेल्या रुग्णांना खर्चाची प्रतिपुर्ती म्हणून अर्थसहाय्य देय नाही.
- मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार मिळणारे आजार :-
मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत कॉकलियर इम्प्लांट (वय 2 ते 6 वर्षे), ह्दय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदुचे आजार, हृदयरोग, डायलिसीस, कर्करोग केमोथेरेपी/रेडिएशन , अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण 20 गंभीर आजारासाठी इतर तीन योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.022 22026948 तसेच व्हॉटस अप क्र. 9049789567 यावर संपर्क साधावा.
- मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कागदपत्रे :-
मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत लाभ मिळण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्यास त्याचा जीओ टॅग फोटो सोबत जोडणे बंधनकारक आहे. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकिय खर्चाचे प्रमाणपत्र खाजगी रुगणालय असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा असणे आवश्यक आहे. रुग्णांचे आधारकार्ड, लहान बाळासाठी आईचे आधारकार्ड आवश्यक आहे. रुग्णांची शिधापत्रिकेची प्रत संबंधीत आजाराचे रिपोर्ट तर अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट आवश्यक आहे. प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी, शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. या सर्व प्रक्रिया पार पाडतेवळी संबंधित रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. तसेच अर्थसहाय्याची मागणी ई-मेलद्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे पिडीएफ स्वरुपात वाचनीय स्थितीत त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाद्वारे तात्काळ पाठविण्यात यावी.
राज्याबाहेरील रुग्णालयावर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते तसेच त्यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णालयांना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची यादी cmrf.maharashtra.gov.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
– जिल्हा माहिती कार्यालय, जालना
