नवविवाहितेचे अपहरण करण्याचा प्रयत्न नातेवाईक,ग्रामस्थांनी हाणून पाडला,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल,तालुक्यातील इंदापूर चौफुलीवरील घटना
खुलताबाद /प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील -पिशोर येथुन लग्न लावुन बाजारसावंगी येथे परतत असतांना यातील नवरीला गाडीतून बळजबरीने ओढुन अपहरण करण्याचा प्रयत्न नातेवाईक व ग्रामस्थांनी हाणून पाडला,सदरील घटना खुलताबाद तालुक्यातील इंदापूर चौफुलीवर शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी घडली,या ठिकाणी मोठा गोंधळ सुरू होता,घटनास्थळी बाजार सावंगी पोलीस चौकीचे पोलीस दिलीप बनसोड एस बी सपकाळ संतोष भालेराव सह तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.या बाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरा राहुल नलावडे रा.मयुर औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पोलीस ठाण्यात नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,माझा चुलत भाऊ अमोल प्रभाकर नलावडे त्याचे लग्न आटोपून नवरीला घेवुन बाजारसावंगी येथे येत असतांना इंदापूर चौफुलीवर जय भवानी मंगल कार्यालयासमोर असतांना पांढरया रंगाची क्रेटा गाडी क्र.एम.एच.२८ ए.झेड.६६९९ ही गाडी आमच्या गाडीला आडवी लावुन यातील आरोपीतांनी संगनमताने कट रचून गाडीला बळजबरीने अडवून ठेवले.
या गाडीतील नवरी मुलीला तिचे इच्छेविरुद्ध बाहेर ओढले,याला मी व साक्षीदारांनी विरोध केला असता आरोपीतांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत,लाथा बुक्क्यांनी मारहाण केली,नवरी मुलीचे बळजबरी अपहरण करण्याचा प्रयत्न केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सहा जणांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेत वापरलेल्या क्रेटा गाडीने घटनास्थ ळावरून पळ काढतांना बाजारसावंगी येथे तीन जणांना जखमी केले यातील इंदापुर येथील पंडित भालेराव गंभीर रित्या जख्मी असून इतर दोन जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
