नाटिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत
कायद्याविषयी जनजागृती अभियान
राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहनिमित्त विशेष उपक्रम
जालना/प्रतिनिधी/ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधीसेवा सप्ताहानिमित्त राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या इंग्लिश माध्यम शाळेत मुलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नाटिकांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष सतीश बागडिया आणि मुख्याध्यापिका सौ. रिटा टंडन होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश वर्षा मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नीतेश बंडगर, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. हेमा जयस्वाल, जयश्री राऊत, पूनम अग्रवाल , रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अंकित अग्रवाल, दीपक गोयल, ॲड. महेश धन्नावत, ॲड. अश्विनी धन्नावत आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या अधिव्याख्याता ॲड. औममहेश्वरी जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कायदेशीर विषयांवर नाटिका सादर केल्या. यामध्ये सौ. सारिका महाजन यांनी ‘ग्राहक हक्क’, सौ. सुरेखा उपरे यांनी ‘लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा’ आणि ‘शिक्षणाचा हक्क’, सौ. स्वाती मुथा यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण’ आणि सौ. विद्या ठाकूर यांनी ‘संवैधानिक कर्तव्ये’ या विषयांवर आधारित नाटिकांचे आयोजन केले होते.भारतातील न्यायव्यवस्थेने वेळोवेळी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये कायदेशीर साक्षरतेच्या गरजेवर भर दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये हे स्पष्ट केले आहे की, कायद्याचे ज्ञान केवळ वकिलांपुरते मर्यादित न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी सक्रियपणे माहिती देणे हे व्यवस्थेचे कर्तव्य आहे. अलीकडे मुलांमधील संमतीने असलेल्या संबंधांमध्ये ‘लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्या’चा गैरवापर होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे आणि या विषयावर कायदेशीर जागरूकता होणे गरजेचे आहे, असे मत प्रकट केले आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, व्याख्यानांपेक्षा नाटिकांसारख्या माध्यमातून मुलांना कायद्याचे आणि नागरी जाणिवांचे धडे सहज मिळतात. रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अंकित अग्रवाल म्हणाले की, “रोटरी कायदेशीर जागरूकता वाढवण्यासाठी अशा नाटिकांना प्रोत्साहन देईल. कायदेशीर जागरूकता व ज्येष्ठ नागरिकांच्या शिक्षणात रोटरीला सहभागी करून घ्यावे. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. हेमा जयस्वाल यांनी ‘पोक्सो’ कायद्याबद्दल जागरूकता ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. ॲड. महेश धन्नावत यांनी ग्राहक जागृतीसोबतच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि शिक्षणाच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. ॲड. जाधव यांनी सांगितले की, विधीच्या विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जाऊन नाटिका सादर कराव्यात, जेणेकरून ते स्वतः कायद्याबद्दल जागरूक होतील आणि कायदेशीर जागृतीही निर्माण होईल.पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक अजय बन्सल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभाग बालस्नेही आणि लोकाभिमुख पोलीस स्टेशन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मुलांनी कोणत्याही परिस्थितीला घाबरू नये, पोलीस आणि संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक शेळके केले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना मनोरंजनातून कायद्याचे महत्त्वपूर्ण ज्ञान दिले.