शनिवार वाडा ‘नमाज पठण’ प्रकरणात हिंदू महासभेची उडी; पोलिसांकडे पत्राद्वारे केली मागणी, म्हणाले, ‘आधार कार्ड चेक करूनच लोकांना आतमध्ये सोडावं..’
पुणे: पुण्यातील शनिवार वाड्यातील काही दिवसांपूर्वी नमाज पठणाचा (Shaniwarwada Namaz Pathan) व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या. शनिवार वाडा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. १७३० मध्ये बाजीराव पेशव्यांच्या काळात ही वास्तू बांधली गेली. या वाड्याला इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे. शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेने या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं. मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. शनिवार वाड्यात ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं तिथे गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्यात आली. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र केली. त्यानंतर आता ऐतिहासिक शनिवार वाड्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावं, आधार कार्ड चेक करूनच लोकांना आतमध्ये सोडावं अशी मागणी हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे.
