नादरपुर ग्रामस्थांची मागणी डावा कालवा पोटचारीची दुरुस्ती तात्काळ करावी
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथील अंजना-पळशी मध्यम प्रकल्प अंतर्गत डावा कालवा व पोटचारी यांचे मोठ्या प्रमाणावर कामकाज झाले असून यावर शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. या कालव्यांचे व पोटचारीचे नियमित संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असून, नादरपूर येथील ग्रामसभेत शेतकरी बांधवांनी वारंवार याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
ग्रामसभेत पारित ठरावानुसार शेतकऱ्यांची भूसंपादित जमीन सातबारा उताऱ्यातून कमी करणे, तसेच पोटचारीची साफसफाई व दुरुस्ती करणे या बाबींची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाळ्यात पोटचारी फुटण्याची शक्यता असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.ग्रामस्थांनी सांगितले की, कालवा व पोटचारीच्या कडेच्या रस्त्यांचेही संवर्धन आवश्यक आहे. तसेच काही व्यक्ती या पायाभूत सुविधांना बाधा पोहोचवत असल्यास त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी आपले नुकसान टाळण्यासाठी पोटचारीची तातडीने साफसफाई व दुरुस्ती करून संवर्धन करण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.छायाचिञ सुनिल निकम