मुंबईचा महापौर महायुतीचाच; संजय राऊतांनी दिवास्वप्ने पाहू नयेत!
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा ‘उबाठा’ गटावर घणाघाती प्रहार
मुंबई: “मुंबई महापालिका निवडणुकीत मतदारांनी उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवून दिली असून, महायुतीच्या विकासाच्या धोरणावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार आणि महापौरही महायुतीचाच होणार,” असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना बन म्हणाले की, “संजय राऊतांनी मुंबईच्या महापौरपदाची कितीही दिवास्वप्ने पाहिली तरी ती कधीही पूर्ण होणार नाहीत. १६ जानेवारीचा निकालाचा दिवस उबाठा गटासाठी ‘काळा दिवस’ ठरला आहे, तर ज्या दिवशी महायुतीचा महापौर बसेल, तो दिवस मुंबईकरांसाठी ‘सुवर्ण दिवस’ असेल.”
प्रेस नोटमधील महत्त्वाचे मुद्दे:
-
२५ वर्षांच्या लुटीचा अंत: उबाठा गटाने २५ वर्षे सत्तेत राहून मुंबईला लुटले. महायुतीचे मुख्य ध्येय ही लूट थांबवून मुंबईकरांचे जीवन सुरक्षित आणि सुकर करणे हे आहे.
-
विकासाचा विजय: २९ पैकी २५ ठिकाणी भाजप अव्वल ठरली आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे.
-
नेत्यांचा निर्णय अंतिम: महापौर पदाबाबत भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते चर्चा करून लवकरच योग्य निर्णय घेतील. तोपर्यंत राऊतांनी वायफळ बडबड थांबवावी.
